Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय शाब्दिक संघर्ष आता आणखी रंगला आहे. बुलढाण्यातील राजकीय शक्ती प्रदर्शनात धनुष्य बाणाचा इशारा करून बाप तो बाप रहेगा या गाण्यावरून महाले यांनी गायकवाड यांना डिवचले होते. आता गायकवाड यांनी महालेंच्या भूमिकेवर जोरदार पलटवार केला आहे. “राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी दाखवून देऊ,” असा थेट इशाराच गायकवाड यांनी दिला.
शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले, श्वेता महाले या आपली बहीण आणि ताई असल्याचे सांगत त्यांच्याशी समोरासमोर बोलण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण आणि श्वेता महाले सोबत होतो. एका ताटात आणि एका चमच्याने जेवलो आहोत. त्यामुळे समोर येऊन बोलण्याचा प्रश्नच नाही.
वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून स्पर्धा करण्याचा आपला हेतू नाही. त्यांनी बुलढाण्यात भाजप वाढवावी, आम्ही चिखलीत शिवसेना वाढवू. कशाला विरोध करता?” असा सवाल केला. मात्र, बुलढाण्यातील भाजप काँग्रेसच्या दावणीला बांधली जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
आपल्या रॅलीला पाहून घाबरल्याने लाईट बंद करण्यात आल्याच्या चर्चेवरही गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. संजय गायकवाडच्या रॅली लोकांनी यापूर्वी पाहिल्या आहेत. त्यामुळे कोणाच्या रॅलीला घाबरण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमादरम्यान लाईट जाणे ही सामान्य बाब असल्याचे सांगत, आपण त्यावेळी कर्नाटकात होतो आणि या प्रकाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाढदिवसाच्या कार्यक्रमांवरील खर्चावरूनही गायकवाड यांनी श्वेता महालेंवर निशाणा साधला. “माझ्याकडे हरामाचे पैसे नाहीत. मी अशी पैशाची उधळपट्टी करणार नाही. वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर मोठा खर्च करण्याऐवजी गरजू व्यक्तींना मदत करावी. आपण एखाद्या शेतकऱ्याला मदत केली, तर त्याला मदत करण्याची स्पर्धा करावी; मात्र वाढदिवसाच्या कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी करण्याची गरज नाही. माझ्याशी फाईट करायची असेल तर विकासाची फाईट करा, असे आव्हानही महाले यांना दिले.
अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना कामाला लावून अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे योग्य आहे का, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला. तसेच वाढदिवस साजरा करण्यासाठी लोक भाड्याने आणण्याची गरज आपल्याला पडत नाही, असा दावाही त्यांनी केला.
श्वेता महाले यांनी बुलढाण्याचा कचरा चिखलीपर्यंत आला असल्याची टीका केली होती. यावर बोलताना त्यांनी बुलढाण्याच्या विकासाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळत असल्याचे म्हटले. बुलढाणा शहरात विकास झाला आहे की कचरा, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या मुद्द्यावर अधिक बोलण्यात अर्थ नसल्याचे महाले यांनी सांगितले.
DJ बंदीच्या मुद्द्यावरून गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचा दाखला देत महाले यांच्यावर प्रश्न उपस्थित केला. श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे खासगी सचिव आहेत. ते देखील श्वेता महाले यांच्यासोबत राजकीय शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते.
यावर बोलताना गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त DJ, पोस्टर आणि बॅनर टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिवच DJसह रॅली काढून वाढदिवस साजरा करत आहेत. दुष्काळाची परिस्थिती असताना अशा प्रकारे रॅली काढून वाढदिवस साजरा करण्याऐवजी गरजू आणि शेतकऱ्यांना मदत करावी, असे ते म्हणाले.
महाले यांच्या ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर प्रतिक्रिया देताना “बाप तो बाप रहेगा, हे माणसाने बोलले तर बरं आहे. एखाद्या बाईने म्हटलं की मी बाप आहे, तर बापासारखं शरीर कुटून आणणार आहे. हे शोभतं का बोलायला?” असा सवाल गायकवाड यांनी केला. याच मुद्द्यावर पुढे जात त्यांनी “राजकारणातला बाप कोण आहे, हे योग्यवेळी दाखवून देऊ,” असा इशारा दिला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीतील या दोन आमदारांमधील शाब्दिक संघर्षाला आता नवं वळण मिळालं आहे.