Allegations of District Chief Post Sales in Shiv Sena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ते भाजपात दाखलसुद्धा झाले आहेत. आता नवे जिल्हाप्रमुख कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच वरोरा शहरातील होर्डिंगने चांगलीच खळबळ उडाली आहे.
वरोरा शहरात 10 ते 25 लाखांत जिल्हाप्रमुख विक्रीस उपलब्ध आहे, ज्या कोणाला प्रमुख व्हायचे आहे, त्यांनी राऊत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या होर्डिंगमधून करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या फलकावर संजय राऊत यांचे व्यंगचित्रही काढण्यात आले आहे. हे पोस्टर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला असून राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
होर्डिंगवरून वाद निर्माण होणार असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून फलक हटवले आहेत. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी पक्षात पदांची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. रोज नाट्यमय घडामोडी घडत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने बँकेच्या अध्यक्षपदावर दावा केला जात आहे.
आमचेच सर्वाधिक संचालक निवडून आले आणि अध्यक्षही आमचाच होणार असल्याचे भाकीत वर्तविली जात आहे. यात महाविकास आघाडीसोबत असलेले ठाकरेंचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे आता महायुतीत दाखल झाले आहेत. अध्यक्षपदासाठी त्यांनी तडजोड केली असल्याचे बोलले जात आहे. तर ईडीचा धाक दाखवून त्यांना ठाकरेंना सोडायला लावली असाही आरोप आहे. यात आता वरोरा शहरात लागलेल्या होर्डिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिंदे यांनी राजीनामा देताच पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली. नवा जिल्हाप्रमुख नेमण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी वरोऱ्यातील विश्रामगृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाप्रमुख निवडण्यासाठी संदीप गिऱ्हे यांच्याशी चर्चा केली. सध्या जिल्हाप्रमुख पदासाठी मनीष जेठानी, दत्ता बोरीकर, वैभव डहाने, नंदू पडाल आणि भास्कर ताजने यांची नावे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आली असल्याचे समजते.
दरम्यान, माजी जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी संधी साधत राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, पक्षात 10 ते 25 लाख रुपये घेऊन पदे विकली जातात. मला तीनवेळा जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले. मी विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. यानंतरही राऊत यांनी पैसे घेऊन जिल्हाप्रमुख पद विकले. जीवतोडे सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत असून, त्यांच्याकडे लोकसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.