Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Shivsena : ‘याचा’ फटका उद्धव ठाकरेंच्या गटापेक्षा भाजपलाच जास्त बसणार !

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackera News : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना खिळखिळी झाल्याचे दिसत आहे. ‘मी खचलेलो नाही, तुम्हीही खचू नका’, अशा धीर ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे. पण चिन्ह गेल्याचा जो फटका बसायचा, तो बसणारच आहे, असे सैनिकांचे म्हणणे आहे.

चिन्हे गेल्यानंतर ठाकरेंचे सैनिक संभ्रमात सापडले आहेत. विदर्भात आणि त्यातल्या त्यात पूर्व विदर्भात शिवसेनेची खास अशी ताकत यापूर्वीही नव्हती. महानगरपालिकेत दोन नगरसेवक होते. आता चिन्ह गेल्यामुळे येत्या निवडणुकीत लढायचे कसे, असा प्रश्‍न त्यांना सतावू लागला आहे. पण तरीही या नगरसेवकांना ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शिंदे गटात जाणार नाही. ठाकरेंसोबत राहून संघर्ष करू आणि आमची सेना पूर्ववत उभी करू, असे त्यांचे म्हणणे आहे.

झालेल्या घडामोडींचा फटका तुम्हाला बसणार नाही का, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्व विदर्भाचे संघटत सतीश हरडे यांना विचारले असता, ते म्हणाले, या सर्व घडामोंडीमुळे उद्वव ठाकरे यांच्यापेक्षा भाजपलाच जास्त फटका बसणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचाच नव्हे तर पक्षापाती असल्याचे मत जनतेचे झाले आहे. हे सर्व भाजप नेत्यांच्या दाबावाखाली सुरू असल्याचे जनतेला कळून चुकले आहे.

आता पक्ष सोडून कुणी जाणार नाही !

भाजपनेच सर्वकाही सत्तेसाठी घडवून आणले आहे, असे लोकांना वाटते आणि तेच सत्य आहे. आमचे जे काही नुकसान व्हायचे ते आधीच झाले. ज्यांना जायचे होते ते आधीच निघून गेले. आता कोणी पक्ष सोडून जाईल, असे वाटत नाही. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला लढा देण्यास सांगितलेले आहे. निष्ठावान शिवसैनिकांसाठी हा संदेश महत्त्वाचा आहे.

भाजपला (BJP) फटका बसणार असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर शिंदे गट आणि भाजप जोमात तर ठाकरे गट कोमात, अशी स्थिती बघायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या सैनिकांचे मनोबल घसरल्याचेही चित्र आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या सैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न जरूर करत आहे. पण यात ते कितपत यशस्वी होतात, हे आगामी निवडणुकांचे निकाल सांगणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT