Eknath Shinde and Gopikishan Bajoriya, Prataprao Jadhav. Sarkarnama
विदर्भ

Shivsena : बळकटी न देता भानगडीच जास्त, बाजोरियांची हकालपट्टी; जाधव नवे संपर्कप्रमुख !

Bajoriya : त्यांच्या कार्यकाळात अकोला जिल्ह्यात शिंदे गटाला बळकटी मिळण्याऐवजी वादच अधिक झाले.

सरकारनामा ब्यूरो

Prataprao Jadhav has the responsibility of the liaison chief : माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे शिवसेना (शिंदे गट) संपर्कप्रमुख पदाची सोपविलेली जबाबदारी औट घटकेची ठरली. त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून, खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलढाणा लोकसभेसह अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडत शिवसेनेचा गट स्थापन केल्यानंतर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात अकोला जिल्ह्यात शिंदे गटाला बळकटी मिळण्याऐवजी वादच अधिक झाले. दोन्ही जिल्हा प्रमुखांसह महानगराध्यक्ष विरोधात गेले.

निधी वाटपावरून बाजोरिया यांची थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेत बाजोरिया यांच्याकडील संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. शिंदे गटाकडून काल रात्री उशिरा नवीन संपर्कप्रमुखांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघासह अकोला लोकसभा मतदारसंघाचीही जबाबदारी सोपविण्यात आली.

बाजोरियांचे पद ठरले औटघटकेचे..

शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील लोकसभा संपर्क प्रमुखांची यादी जाहीर केली. अकोला आणि बुलढाणा लोकसभा संपर्क प्रमुखाची जबाबदारी खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे सोपविलेली अकोला लोकसभेची जबाबदारी औटघटकेची ठरली आहे.

पक्ष संघटनही हातातून गेले..

शिवसेनेकडून दोन वेळा विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर निवडून आलेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटातील त्यांचे वर्चस्व कमी झाले. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले होते. आता शिंदे गटातील संपर्कप्रमुख पद तर गेलेच पण त्यांनीच नियुक्त केलेले दोन्ही जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्षांसह पक्ष संघटनही त्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे आता पुन्हा बाजोरिया एकाकी पडले आहेत.

शिंदे गटातील नेमका वाद काय ?

पक्षाचे माजी संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर गंभीर आरोप पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून झाले. शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बाजोरियांची लेखी तक्रार करण्यात आली होती. ११ फेब्रुवारीला शिवसेनेचे (Shivsena) अकोल्याचे (Akola) जिल्हाध्यक्ष आश्विन नवले, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष निखिल ठाकूर, मुरलीधर सटाले, नितीन मानकर, शशिकांत चोपडेंसहसह १३ पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेले तक्रारीचे पत्रच मुख्यमंत्र्यांना पाठविले.

पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निधीतून बाजोरिया यांच्यावर कमिशन घेतल्याचा आरोप पत्रात करण्यात आला होता. बाजोरिया यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, हा वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचला होता. त्यावर सुनावणीही घेण्यात आली. दोन्ही गटांत मनोमीलन घडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर बाजोरिया यांची संपर्क प्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT