Ravikant Tupkar Burn Soyabin at Buldana
Ravikant Tupkar Burn Soyabin at Buldana Sarkarnama
विदर्भ

आज सोयाबीन जाळले, उद्या सरकारही जाळू; रविकांत तुपकर कडाडले...

सरकारनामा ब्यूरो

बुलडाणा : केंद्रातील मोदी सरकार असो की राज्यातील आघाडी सरकार, त्यांनी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची घोर उपेक्षा चालविली आहे. हे थांबविण्यासाठी दीर्घकालीन आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 31 ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथे विराट एलगार मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी येथे केली. सत्ताधाऱ्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली नाही, तर सरकारचा शिमगा करू. आज सोयाबीनची प्रतिकात्मक होळी केली, सरकार नमले नाही तर हे सरकार जाळायला मागेपुढे पाहणार नाही, असा जळजळीत इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी रविकांत तुपकरांनी कंबर कसली असून त्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी चालविली आहे. येथील शासकीय विश्रामगृहात आज 22 ऑक्टोबर रोजी दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना शेतकऱ्यांची कथा अन् व्यथा मांडून वरील इशारा देतानाच स्वतः न मरता (आत्महत्या न करता) मरायची तयारी ठेवा, असे रोखठोक आवाहन देखील तुपकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. केंद्र शासनाने सोयाबीन ला 8 हजार तर कपाशीला 12 हजार प्रति क्विंटल रुपये किमान भाव द्यावा, त्यासाठी धोरण आखावे, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरच्या मर्यादेशिवाय सरसकट 50 हजार रुपये मदत द्यावी, सोयापेंड आयात बंद करून पामतेल व खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवावी, लॉक डाऊन काळातील घरगुती वीजबिल माफ करून कनेक्शन कापणे बंद करावे, खाद्य तेल व तेलबियांवरील साठा मर्यादा अट शिथिल करावी, खरडून गेलेल्या नदीकाठच्या शेत जमिनी तयार करण्यासाठी 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा करावी, कृषी पंपांचे बिल माफ करावे आदी मागण्यांसाठी एल्गार मोर्चा व आंदोलन करण्यात येणार आहे, असे तुपकर यांनी यावेळी सांगितले.

31 तारखेला दुपारी 12 वाजता बुलडाणा शहराची ग्रामदेवता असलेल्या (चिखली मार्गावरील) जगदंबा देवीला साकडे घालून नंतर जिजामाता महाविद्यालय समोरून निघणारा हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकणार आहे. यानंतर पुढील टप्प्यात विदर्भ, मराठवाडा व खानदेशमध्येही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे तुपकरांनी सांगितले. केंद्र असो वा राज्य सरकार, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परवड कायम आहे. नुकसान झाले की नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी येतात, फोटोसेशन पुरती पाहणी करतात, सरकार तुमच्या पाठीशी अशी तोंड पुंजली भाषा करतात, पण प्रत्यक्षात काहीच करीत नाही.

सरकार जखम मांडीला अन् मलम शेंडीला, या धर्तीवर भिकेसारखी मदत करते, अशी घणाघाती टीका तुपकर यांनी बोलताना केली. पश्चिम महाराष्ट्रात ऊस, दुधाच्या प्रश्नावर वा विकासाच्या कॉमन इश्यूवर सर्व शेतकरी, पक्ष, नेते एकत्र येतात, त्यामुळे त्यांच्या मागण्यांची गंभीर दखल घेते, त्यांना न्याय मिळतो. विदर्भात नेमके शेतकरी, पक्ष एकत्र येत नाही, बळीराजा पेटून उठत नाही, यामुळे आंदोलने फसतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना दिली. यासाठी स्वाभिमानीसह अन्य पक्ष शेतकऱ्यांना एकत्र आणण्यात अपयशी ठरल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. मुळात विदर्भातील नेते या कामी कमी पडल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

सडलेल्या सोयाबीनची होळी..

दरम्यान या पत्रकार परिषदेपूर्वी विश्राम गृहासमोरील मोकळ्या जागेत सडलेल्या सोयाबीनची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. ही होळी म्हणजे नजीकच्या काळातील जहाल आंदोलनाची पडलेली ठिणगी असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, नितीन राजपूत, पवन राजपूत, शेख रफिक, यासह कार्यकर्ते हजर होते.

दबाव गट हवा..

विदर्भातील शेतकरी व नेत्याचा दवाब गट असला पाहिजे. बाजार समित्या पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोरांच्या हाती गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच आर्यन खान, कंगना राणावत, किरीट सोमय्या, नवाब मलिक जावई प्रकरणांची चर्चा घडवली जातेय. ऊस-दूध दर आंदोलनाच्या धर्तीवर सोयाबीन-कापूस आंदोलनही आम्ही पेटवणार आहोत. राज्य शासनाचा इतर खर्च सुरूच, पण शेतकऱ्यासाठी मात्र पैसे नाही. आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा, सत्ता नव्हे, प्रसंगी आघाडीतूनही बाहेर पडू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT