Dr. Nitin Raut
Dr. Nitin Raut Sarkarnama
विदर्भ

पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना हुसैन यांची जीभ घसरली, कॉंग्रेसच्या आंदोलनाला वेगळे वळण...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना नोटीस दिल्यानंतर कॉंग्रेसच्यावतीने आज नागपूरच्या ईडी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन यांची जीभ घसरली. हुसैन यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची तक्रार भाजप नेते सकाळी १०.३० वाजता गिट्टीखदान पोलिस ठाण्यात करणार आहेत, असे भाजपचे प्रदेश पॅनलिस्ट प्रवक्ता चंदन गोस्वामी यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात जोरदार नारेबाजी व भाषणे देण्यात आली. दरम्यान आंदोलनासाठी उभारलेल्या मंचावरून बोलताना काँग्रेसचे (Congress) माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन यांची जीभ घसरली व त्यांनी पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह विधान केले. आंदोलनात काँग्रेसचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, (Dr. Nitin Raut) ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासह आमदार, माजी मंत्री, माजी आमदार व काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानाबद्दल करण्यात आलेल्या विधानाच्या विरोधात भाजपतर्फे सकाळी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. ईडीच्या कार्यालयावर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.

तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनात अचानकपणे शेकडो कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. पोलिसांचा पहिला बॅरिकेट खाली पाडून काँग्रेसचे मंत्री, नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाच्या मुख्य दारावर चढून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धक्काबुक्की झाली. दरम्यान ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे देखील ईडी कार्यालयाच्या मुख्य दारावर चढले व गांधी परिवारावर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात घोषणा दिल्या.

काँग्रेसतर्फे करण्यात आलेले हे आंदोलन फक्त ‘ट्रेलर’ असून ‘पिक्चर अभी बाकी’ असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला़. जेव्हा जेव्हा गांधी घराण्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तो राजकारणातून संपला, हा देशाचा इतिहास आहे. जे इंग्रजांना नाही घाबरले ते तुम्हाला काय घाबरणार, असे यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. पोलिसांनी धरणे प्रदर्शनाचा मंच सोडून ईडी कार्यालयाच्या मुख्य दारातून आत शिरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह माजी मंत्री वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, राजेंद्र मुळक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, आमदार राजू पारवे, आमदार सहसराम कारोटे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, गिरीश पांडव, किशोर गजभिये यांच्यासह जवळपास ५० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.

पंतप्रधानासंदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भाजपाच्यावतीने आज सकाळी १०.३० वाजता गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित राहतील. पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात मंचावर उपस्थित असलेल्या राज्यातील मंत्र्यांनी माफी मागावी व पंतप्रधानांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पुढे राज्यभर विविध पोलीस ठाण्यांत यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही भाजपचे प्रदेश पॅनलिस्ट प्रवक्ता चंदन गोस्वामी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT