Village Roads & Vinay Gauda Google
विदर्भ

Chandrapur Administration : पांदन रस्त्यांनी होणार शेती समृद्ध; चंद्रपुरात प्रशासन झालं त्यासाठी वचनबद्ध

संदीप रायपूरे

Prosperous Agricultural Revolution : पांदन रस्ते समृद्ध शेतीत महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु जागेच्या वादातून अनेकदा या रस्त्यांची कामं होत नाहीत. अनेकदा धुऱ्याला धुरा लागून असल्यानं रस्त्याचं कामाचा वाद प्रचंड विकोपालाही जातो. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा प्रशासन आता पाच हजार किलोमीटरचे पांदन रस्ते तयार करणार आहे. तसं उद्दिष्टच त्यांनी डोळ्यापुढं ठेवलंय. यासाठी विशेष मोहीमही राबविण्यात येणार आहे. यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यांनं पुढाकार घेतलाय.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यासाठी अधिकाऱ्यांच्या मदतीनं गावनिहाय नियोजन तयार केलंय. आता हा ‘मेगाप्लान’ राबविण्यात येणार आहे. रस्त्यांच्या या प्रकल्पाचा प्रशासकीय शुभारंभही करण्यात आला आहे. पिकं निघाल्यानंतर प्रत्यक्षात पांदन रस्ते तयार करण्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळं जिल्ह्यातील शेती समृद्ध होण्यास मोलाची मदत होणार आहे. (Special Movement for village farm roads by IAS Vinay Gauda & Chandrapur Administration for Prosperous Agricultural Revolution)

शेतीच्या जागेचे वाद हे साधारण नसतात. शेतीसंबंधित जागेच्या वादामुळं अनेकदा गुन्हेही घडले आहेत. अशा स्थितीत पांदन रस्त्यांची पुरती वाट लागते. त्याचा परिणाम परिसरातील अनेक शेतकऱ्यांवर होतो. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं आता पांदन रस्त्यांसाठी विशेष मोहीमच सुरू केलीय. जिल्ह्यात तब्बल पाच हजार किलोमीटर लांबीचे पांदन रस्ते या मोहिमेतून बांधण्यात येणार आहेत. पांदन रस्त्यांबाबत ग्रामपंचायत स्तरावर ठराव घेण्यासही सुरुवात करण्यात आलीय.

ग्रामपंचायतींचे हे ठराव तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार आहेत. तहसीलदारांमार्फत बांधकाम विभागाकडून रस्त्यांचं अंदाजपत्रक तयार केलं जाईल. त्यानंतर जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात पांदन रस्ते तयार करण्याच्या कामाला सुरुवात होईल. कुणी रत्याला मंजुरी देत नसेल तर गाव तंटामुक्त समिती यावर निर्णय देणार आहे. तिथेही हा प्रश्न सुटला नाही तर पोलिस प्रशासन व महसूल विभाग संयुक्तपणे हे प्रकरण हाताळणार आहे. त्यातून कोणत्याही परिस्थितीत पांदन रस्ता तयार करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सध्या सर्व विभागांची बैठक घेत पांदन रस्त्यांच्या उपक्रम राबविण्यासाठी संबंधित कामाला प्राधान्य देण्याचे आदेश दिलेत. ‘बळीराजा समृद्धी शेत रस्ते मोहीम’ असं नाव या विशेष मोहिमेला देण्यात आलंय. यासाठी सर्व तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, सर्व सरपंच, सर्व पोलिस पाटील यांची खास समिती तयार करण्यात आलीय.

शेतकरी कृषी निविष्ठा बी-बियाणं शेतापर्यंत सहजपणे पोहोचविणे, योग्य पद्धतीनं पीक पालटणं, रस्त्याच्या उपलब्धतेमुळे नगदी पिकांमध्ये वाढ, जमिनीच्या किमती वाढ, दळणवळणाच्या साधनांमुळे थेट शेतीपर्यंत पोहोचण्यास मदत, बाजारपेठजवळ करणे असे लाभ पांदन रस्त्यांमुळं शेतकऱ्यांना होणार आहेत. यासंदर्भात बोलताना गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाडे म्हणाले की, पांदन रस्ते तयार करण्याच्या उपक्रमाबाबत बैठक घेण्याचं काम जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सूचनेनुसार सुरू झालंय. शेती व शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.

(Edited By : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT