Amol Mitkari demands Congress apology : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
या पोस्टवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून, माजी आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
वादाची पार्श्वभूमी बीड दौऱ्यादरम्यान घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) पत्रकार परिषद घेत असताना कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारले जात होते. त्यावेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना थांबविल्याचा आरोप झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद संपवली.
या घटनेचा संदर्भ देत काँग्रेसच्या (Congress) अधिकृत 'एक्स' खात्यावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. त्यात "अशा किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार?" असा सवाल उपस्थित करण्यात आला. या पोस्टनंतर सोशल मीडियावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.
दरम्यान, या पोस्टवरून अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर टीका करत पक्षाच्या अधोगतीची चार प्रमुख कारणे असल्याचा दावा केला. "स्वतःच्या इतिहासाचा विसर पडणे हे काँग्रेसच्या अधःपतनाचे एक प्रमुख कारण आहे," असे ते म्हणाले.
इतिहासाचा दाखला देताना मिटकरी यांनी 1966 मध्ये जनसंघाचे नेते राम मनोहर लोहिया यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. तसेच, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधातही अशाच प्रकारची वक्तव्ये झाल्यानंतर समाजमन दुखावल्याची आठवण त्यांनी करून दिली.
महिलांबाबत अवमानकारक भाषा वापरणे चुकीचे असल्याचे सांगत मिटकरी म्हणाले, "काँग्रेसनेही आज त्याच पातळीवर जाऊन वर्तन केले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी. तसेच ही पोस्ट करणाऱ्यांवर पक्षाने योग्य ती कारवाई करावी."
यापुढे इशारा देताना त्यांनी म्हटले, "जर काँग्रेसने माफी मागितली नाही आणि संबंधितांवर कारवाई केली नाही, तर हे आंदोलन इतके मोठे होईल की ते काँग्रेसच्या विनाशाचे कारण ठरेल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.