Sunil Kedar Vs Sameer Meghe Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar Vs Sameer Meghe : आमदार मेघेंविरोधात सुनील केदार समर्थकांसह महाविकासआघाडी अधिकच आक्रमक!

Rajesh Charpe

Hingana Assembly Constituency Politics News : हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघातील सुमारे १९ हजार बोगस मतदार शोधून काढण्यात आले आहेत. सोबतच मेघे यांच्या मालकीच्या महात्मा गांधी शाळेत लागणारे सात बुथ इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे. याकरिता प्रशासनाला सात ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम देण्यात आला आला आहे.

आमदार समीर मेघे(Sameer Meghe) यांचे कट्टर विरोधक, माजी आमदार विजय घोडमारे आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी बोगस नावांची यादीच आज उघड केली. १९ हजार ६९१ नावे बोगस आहेत. तसेच तब्बल ९५०० नावे यादीमध्ये रिपीट असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात कोर्टाने मतदार यादी सात ऑक्टोबरपर्यंत दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहे. आम्ही बोगस नावांची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवली होती. आता न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यानंतरही प्रशासनाने चालढकल केल्यास आम्ही आक्रमकपणे यास प्रत्त्युतर देऊ याची संपूर्ण जबाबादारी प्रशासनाची राहील. सोबतच पुन्हा न्यायालयात जाऊ असाही इशारा घोडमारे आणि कुंदा राऊत यांनी दिला.

आमदार मेघे हे हिंगणा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे आणि माजी मंत्री सुनील केदार(Sunil Kedar) यांचे चांगलेच खटकले होते. रामटेकमधून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येताच केदारांनी हिंगणा येथे विजय सभा घेऊन मेघे यांना उघड आव्हान दिले आहे. कुठल्याही परिस्थितीत मेघे यांचा पराभव करण्याचे आवाहन केदारांनी केले आहे. तेव्हापासूनच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपसातील मतभेद विसरून आमदार मेघे यांच्या विरोधात ठाकले आहेत.

हिंगणा मतदारसंघातील राजीव नगर ही वस्ती भटक्या विमुक्तांची आहे. गाई, म्हशीचे पालन करणे आणि दुधाची विक्री करणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. या वस्तीत तब्बल १०० मेघे आडनावाचे मतदार आहेत. मेघे यांचे मूळ गाव वर्धा जिल्ह्यातील सावंगी हे आहे. त्यामुळे राजीव नगरात शंभर मेघे आले कुठून असा सवाल घोडमारे यांनी उपस्थित केला. सावंगी येथील रहिवाशांची नावेसुद्धा हिंगणा मतदारसंघाच्या यादीत घालण्यात आली आहेत. याशिवाय आमदार मेघे यांच्या मेडिकल कॉलेजमधील कर्मचारी, विद्यार्थी यांचीही नावे मतदार यादीत असल्याचा दावा घोडमारे आणि कुंदा राऊत यांनी केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT