Sushma Andhare, Congress MLA Vikas Thackeray Sarkarnama
विदर्भ

Nagpur Hit and Run Case : नागपूर 'ऑडी'कार प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा काँग्रेसवरही हल्लाबोल

Rajesh Charpe

Nagpur News, 11 Sep : शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या ऑडीकार अपघात प्रकरणावर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी त्या खास नागपूरला आल्या आहेत. भाजपच्या नेत्यावर आरोप करताना त्यांनी काँग्रेसलाही सोडलं नाही. अपघात झाल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी दोन दिवस गप्प का बसले होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रविवारी मध्यरात्री अपघात झाला मात्र, सोमवारी एकाही काँग्रेसच्या (Congress) नेत्याने वक्तव्य केलं नाही. संकेत बावनकुळे कार चालवत नव्हता असं त्यांना कोणी सांगितलं अशी विचारणा करत त्यांनी थेट कोणाचेही नाव न घेता काँग्रेस शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला.

संकेत बावनकुळेच्या (Sanket Bawankule) कारने चार ते पाच गाड्यांना धडक दिली. त्यानंतर सर्व पळून गेले. यावेळी संकेत हाच कार चालवत होता असा आरोप सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा आहे. आजही त्यांनी या संदर्भात पोलिसांची भेट घेतली. संकेत बावनकुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचीही मागणी केली.

संकेत बारमध्ये दूध प्यायला गेला होता का?

संकेत बावनकुळेचे कारमध्ये असलेले मित्र दारू पिऊन होते. ते सर्व लाहोरी बारमधून निघाले होते. दोघे दारू पित असताना संकेत हा बारमध्ये मसाला दूध प्यायला गेला होता का? असा सवाल त्यांनी केला. तर मंगळवारी माध्यमांसोबत बोलताना विकास ठाकरे यांनी संकेत बावनकुळे हा कार चालवत नव्हता असं सांगितलं होतं. सुषमा अंधारे या नागपूरमध्ये राहात नाहीत. अपघात माझ्या मतदारसंघात झाला. त्यांच्यापेक्षा या प्रकरणाची माहिती मला जास्त आहे असेही ठाकरे म्हणाले होते.

अशातच बुधवारी नागपुरात सुषमा अंधारे आल्या असता त्यांना ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, काल काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले असे ऐकलं. ते घटनेनंतर लगेच का व्यक्त का झाले नाहीत. संकेत गाडी चालवत नव्हता हे त्यांना कसं कळलं? अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या प्रकरणी फिर्याद मागे घेत असल्याचे मला कोणीतरी सांगितले.

मात्र, असे कोणालाही फिर्याद मागे घेता येत नाही. तपासाअंती कोर्टात जाऊन ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला त्या रद्द कराव्या लागतात. मात्र, फिर्याद मागे घेणार असल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे तपास निरपेक्ष व्हावा असे म्हणणे असेल तर त्यांनी पोलिसांना निर्देश देऊन संकेतवर गुन्हा दाखल करायला सांगावं असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT