Sanjay Gaikwad Sarkarnama
विदर्भ

Shiv Sena : हट राजेहो पुडीच निघाली! गायकवाडांच्या गळ्यातील दात वाघाचा नव्हे चारआण्याच्या प्लास्टिकचा

Sanjay Gaikwad : शिवसेनेच्या वाघाचे राज्यभरात जिल्ह्यात हसू. वन विभागाच्या डेहराडून प्रयोगशाळेचा अहवाल मिळाला. स्वत:हून ओढवलेले गुन्ह्याचे संकट टळले पण विश्वासार्हतेचे काय?

Fahim Deshmukh

Shiv Sena : ‘पूर्वीची गोष्ट आहे. 1987 मध्ये मी एका वाघाची शिकार केली होती आणि त्याचा दात काढून गळ्यात घातला.’ त्यावर विचारण्यात आले की वाघ होता की बिबट्या? शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड अगदी रुबाबात म्हणतात वाघाची शिकार केली होती. बिबट्या वैगरेंना तर मी असेच पळवून लावत होतो. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर वन विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली. आपल्याच वक्तव्यावरून अडचणीत आलेल्या संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत बुलढाणा वन विभागाने त्यांच्या गळ्यातील ती दात सदृष्य वस्तू जप्त केली. ही वस्तू डेहराडूनला तपासणीसाठी पाठविण्यात आली. आता या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. जप्त करण्यात आलेली वस्तू खराखुरा वाघाचा दात नसून प्लास्टिकचा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शिकार करून खरोखर गळ्यात घातला असता तर त्या वाघाच्या दातामुळे कदाचित गायकवाड यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली असती. परंतु दस्तुरखुद्द आपण वाघ मारला आणि त्याचा दात काढून गळ्यात घातल्याची चक्क दिवसाढवळ्या आणि ते देखील पूर्ण होशोहवासात गायकवाड यांनी थाप मारल्याचे निष्पन्न झाल्याचे राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यांचे चांगलेच हसू होत आहे. आमदार गायकवाड यांनी घुमजाव करीत तो दात प्लास्टिकचा होता असे आधीच सांगितले असते तर कदाचित बुलढाण्यातील मतदारांना हट राजेहो पुडीच सोडलेली निघाली, असे म्हणण्याची तर वेळ आली नसती अशी हास्यास्पद चर्चा आता बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी आमदार गायकवाड शिवरायांच्या मावळ्याचा पेहराव करून आणि हाती तलवार घेऊन कार्यक्रमस्थळी आले. डोक्यावर फेटा, गळ्यात मोत्यांच्या माळा, हातात तलवार असा त्यांचा पेहराव होता. अर्थात या पहेरावातील कपडेही भाडोत्री असावे, असे आता सांगण्यात येत आहे. यावेळी गायकवाड यांना त्यांच्या गळ्यातील एका ‘लॉकेट’बाबत प्रश्न करण्यात आला. वाघनख आले कोठून. क्षणाचाही विलंब न लावता आमदार गायकवाड म्हणाले,‘अहो मीच मारला वाघ... 1987 मध्ये... 37 वर्षांपूर्वी एका वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातला’ वन विभागाने गायकवाड यांच्या या वक्तव्याची दखल घेतली. यामध्ये नुकतेच वन विभागाने यासंदर्भात गुन्हा दाखल करून आमदार गायकवाडांचे बयाणही नोंदविले.

आमदार संजय गायकवाडांच्या गळ्यातील ती वाघाची दातसदृश्य वस्तूसुद्धा वन विभागाचे पथकाने जप्त केली होती. वन्यप्राण्यांची शिकार हा कायद्याने गुन्हा आहे. काळवीट प्रकरणावरून सलमान खानचे काय झाले होते. 2008 मध्ये बारामतीजवळ तत्कालीन राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दोन चिंकारांची शिकार केली होती. त्यानंतर आत्राम यांचे काय झाले होते, याचे विस्मरण गायकवाड यांना झाले. मात्र आपण काय बोलून गेलो, आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे कदाचित वन विभाकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना कळाले. मात्र आता हा दातच नकली असल्याने गायकवाड यांच्या दाव्यांचे ‘टायर पंक्चर’ झाले आहे. आता कितीही आटापिटा केली तरी ‘बुंद से जो गई, वो हौदो से नही आती..’ असा खोचक सल्ला गायकवाडांना देण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे.

पत्रकार परिषदेत घुमजाव

पत्रकार परिषद घेऊन संजय गायकवाड यांनी याबाबत खुलासा केला. खुलासा काय तर थेट घुमजाव केले. त्यावर भाष्य करताना हे प्रकरण पूर्णपणे मिटले असल्याचे ते म्हणाले आहे. वन विभागाच्या प्राथमिक अहवालामध्ये दात सिल करून प्रयोगशाळेत पाठवला. प्राथमिक अहवालात काहीही तथ्य आढळले नाही. शिवजयंतीच्या कार्यक्रमात आपण छत्रपती शाहू महाराजांची वेशभूषा केली होती. त्यामुळे त्याठिकाणी केलेले वक्तव्य हे गांभीर्याने केलेले नव्हते. ते तात्पुरते बोलताना केलेले वक्तव्य होते. मात्र तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्याची दखल वन विभागाने घेतली. त्यात त्यांना काहीही आढळून आले नाही. जप्त केलेला दात प्लास्टिकचा असल्याचे सांगून हे प्रकरण मिटल्याचा दावा आमदार गायकवाड यांना करावा लागला.

वनविभागाकडून मौन

आमदार संजय गायकवाड यांच्याकडून वाघाचा दातसदृश वस्तू वन विभागाने ताब्यात घेत डेहराडून येथील ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट’मध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. वन विभागाला चाचणी अहवालाची प्रतीक्षा होती. मात्र याबाबत अहवाल प्राप्त होऊन दात प्लास्टिकचे आळायचा खुलासा खुद्द आमदार गायकवाड यांनी केला असला, तरी वनविभागाकडून अहवालाबाबत मौन पाळले जात आहे. त्यामुळे खरोखरच अहवाल आला की, आमदार महोदयांनी शिकारीच्या वक्तव्याप्रमाणे आणखी एक पुडी दिली सोडून असे बोलले जात आहे. दाताबाबत कारवाई केल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही शिंदेचा वाघ मारल्याचा तावात प्रसार माध्यमांना मुलाखत दिली होती. आता अहवाल प्राप्त झाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी गायकवाडांना ‘फॉरेस्ट मिनिस्टर’ केले का? असा टोला विरोधकांनी लगावला आहे.

गायकवाड काहीही दावा करीत असले तरी वन विभागाने यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढलेले नाही. काढले असले तरी ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करायला हवे होते. अधिकाऱ्यांना खरोखरी प्लास्टिकच्या दाताचा अहवाल प्राप्त झाला की प्रकरण ‘मॅनेज’ झाले अशा प्रश्नाच्या पिंजऱ्यात आता बुलढाणा वन विभाग आला आहे. मुद्दा काहीही असो दात असली असता तरी आणि आता नकली निघाला तरी गायकवाड यांची अवस्था ‘करायला गेलो काय अन‌् गळ्यात येत होते पाय’ अशीच झाली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT