Nana Patole and Charan Waghmare
Nana Patole and Charan Waghmare Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News: शिक्षक, पदवीधरच्या उमेदवारांचे टेंशन; त्यात भंडाऱ्याचे प्रकरण, नाना दुहेरी संकटात !

Abhijit Ghormare_Guest

Bhandara ZP News : भंडारा (Bhandara) जिल्हा परिषद उपाध्यक्षांसहित तीन जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणाने भाजपमधून निष्कासीत आमदार चरण वाघमारे यांच्यासह कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही टेंशन वाढले आहे. नाना पटोले यांच्या हा गृह जिल्हा आहे आणि येथे सत्ता बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांचे जिल्हा परिषदेला (ZP) महिला अध्यक्ष देण्याचे स्वप्न भंगणार तर नाही ना. अशी एक शंका निर्माण झाली आहे. दरम्यान काल रात्री ८ वाजता चरण वाघमारेंच्या तुमसर येथील हॉटेलमध्ये नाना पटोले आणि चरण वाघमारे यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. एकीकडे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांच्या उमेदवार निवडीमध्ये सपशेल मात खाल्ल्याने टेंशन मध्ये आलेले नाना पटोले भंडारा जिल्हा परिषदेच्या प्रकरणाने डबल टेंशनमध्ये आले आहेत.

भारतीय जनता पक्षातून निष्कासीत झालेले माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली झालेली नाही. वाघमारेंना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलाच दणका दिला आहे. चरण वाघमारे गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले यांच्यासह तीन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांची पक्षांतर बंदी कायद्यानुसार होणारी कारवाई भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे न होण्याची याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केली आहे.

तिघांच्या अपात्रतेची सुनावणी भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या न्यायालयात होणार आहे. संदीप टाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांच्यावर अपात्रतेची तलवार लटकली आहे. दरम्यान एका महिन्यात यांची सुनावणी होणार आहे.तिघेही लवकरच अपात्र होण्याची दाट शक्यता या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेत या तीन क्षेत्रांसाठी लवकरच जिल्हावासीयांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार असं दिसतंय.

दरम्यान याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेवर होणार असून सत्ता वाचविण्यासाठी चरण वाघमारे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे निश्‍चित. ५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत १० मे २०२२ला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक झाली होती. कॉंग्रेसच्या २१ सदस्यांनी भाजपमधून निष्कासीत करण्यात आलेले चरण वाघमारे यांच्या ६ सदस्यांसोबत मिळून (भाजप ५+१ अपक्ष) सत्ता स्थापन केली. यात कॉंग्रेसचे गंगाधर जिभकाटे अध्यक्ष बनले आणि चरण वाघमारे गटाचे संदीप टाले उपाध्यक्ष झाले.

यावेळी भाजपचे जिल्हा परिषद गटनेते विनोद बांते यांचा व्हिप झुगारून भाजपच्या ५ सदस्यांनी कॉंग्रेसला समर्थन दिले. याबाबत भाजपने तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडे तक्रार करत पक्षाशी बंड करणाऱ्या पाचही जिल्हा परिषद सदस्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली.

कालांतराने चरण वाघमारे गटातील २ सदस्य पुन्हा वाघमारे यांची साथ सोडत भाजपवासी झाले. दरम्यान चरण वाघमारे गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले, उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भंडारा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात अपात्रतेची सुनावणी होऊ नये, यासाठी याचिका दाखल केली होती.

आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांची ही याचिका फेटाळली आहे. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात ही कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट करत चरण वाघमारे गटाला जबर धक्का दिला आहे. दरम्यान ५३ सदस्यीय भंडारा जिल्ह्यात परिषदेत कॉंग्रेसला २१ जागा तर चरण वाघमारे गटाचे ६ (५ भाजप+१अपक्ष) असे २७ मिळून १० मे रोजी सत्ता स्थापन केली होती.

दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार येताच आमदार डॉ. परिणय फुके यांच्या राजकीय खेळीने चरण वाघमारे यांनी पळविलेले २ सदस्य पुन्हा मूळ भाजपकडे आले आहेत. त्यामुळे चरण वाघमारे यांच्याकडे चार जिल्हा परिषद सदस्य उरले आहेत. दरम्यान सत्ता स्थापन केलेल्या कॉंग्रेस-वाघमारे गटाकडे संख्या बळ केवळ २५ (२१ कॉंग्रेस+ ४ वाघमारे) झाले आहे.

भाजपने गोंदियाप्रमाणे भंडारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती केली आहे. त्यामुळे आताचे संख्याबळ बघता जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ दहा झाले तर राष्ट्रवादीला १३ व इतर ३ अपक्ष मिळून राष्ट्रवादी १६ जागा, शिंदे गटाला १ असे २७ (भाजप १० + राकॉ १६ + शिंदे गट १) असे बलाबल राहणार आहे.

त्यामुळे अपात्रतेच्या गोंधळात भाजप अजून ९ सदस्यांना गळाला लावून ३६ चे गुणक तयार करत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करण्याची दाट शक्यता आहे. वाघमारे गटाला आपले ४ व कॉंग्रेसला आपले २१ सदस्य सांभाळून ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे नाना पटोले यांचे टेंशन वाढणार, हे निश्‍चित मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT