Nagpur District Election News : नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत निवडणूक राजकीयदृष्ट्य़ा संवेदनशील आहे. या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी भाजप नेते आमदार समीर मेघे, (Sameer Meghe) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारे, जि.प. सदस्य दिनेश बंग, माजी जि प. सत्तापक्ष नेते बाबा आष्टणकर, वरिष्ठ नेते विठ्ठलराव कोहाड, काँग्रेसचे (Congress) शशिकांत थोटे, शिवसेना (Shivsena) तालुकाप्रमुख जगदीश कन्हेर यांची कसोटी लागणार आहे.
दोन्ही पक्षांनी हनुमानगडावरील श्री क्षेत्र गणेश मंदिरात गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. निवडणुकीवरून आजी-माजी आमदारांत रणकंदन होणार असल्याचे दिसून येत आहे. हिंगणा तालुक्यातील रायपूर, नागलवाडी, वागदरा, कवडस, उमरी वाघ, चिंचोली पठार, खैरी पन्नासे येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार दररोज सकाळी उठल्यावर प्रचारासाठी घराबाहेर पडत आहेत. प्रचाराच्या निमित्ताने मतदारांच्या घरीच चहाचा आस्वाद घेत आहेत. श्री क्षेत्र हनुमानगड देवस्थानातील गणपतीचे दर्शन घेऊन भाजप समर्थीत रायपूर परिवर्तन विकास आघाडीचे सरपंच पदाचे युवा उमेदवार उमेश आंबटकर कुटुंबीयांसह पुजा अर्चा करून आशीर्वाद घेतला.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस समर्थीत रायपूर महाविकास आघाडीच्या सरपंचपदाचे उमेदवार दिपाली कोहाड यांच्याही प्रचाराचा नारळ हनुमानगड देवस्थानातील गणपतीचे दर्शन घेऊन फोडण्यात आला. रायपूर गावाच्या विकासाचे व्हिजन दोन्ही पक्षांनी जनतेसमोर मांडले आहे. आजपर्यंत गावाचा खऱ्या अर्थाने विकास झाला का? याची जाण मतदारांना आहे. ग्रामपंचायतीला महसुलाचे फारसे उत्पन्न नाही. पाणीपुरवठा योजना चालवितानाही तारेवरची कसरत होत आहे. गावात एखादी मोठी घटना घडल्यास अग्निशामक दलाची गाडी जाईल, एवढा सुद्धा प्रशस्त रस्ता नाही. बाजारात प्रस्तावित असलेला व्यापार संकुलाचाही प्रश्न रखडला आहे. यामुळे भविष्यात ग्रामपंचायतीचा महसूल वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रामपंचायतीमुळे विकासासाठी फारसा निधी उपलब्ध होत नाही. यामुळे ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होणे गरजेचे आहे. असे अनेक प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण झाले आहे. वरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी विकासाचे व्हिजन असलेला सरपंच निवडून येणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीत कोष्टी, मुस्लिम, भोई, तेली,कुणबी माळी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, चांभार,मारवाडी समाजाची गठ्ठा मते आहेत. यामुळे या समाजाची महत्त्वाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मतदारांची लोकसंख्या ७९०० च्या घरात आहे. यामुळे गावाचा विकास करणारा नव्या उमेदीचा सरपंच हवा अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. दोन्ही गटाकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. विकासाची गाजर दोन्ही बाजूकडून दाखविले जात आहे. मात्र मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतांची झोळी टाकतो,हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
पठारावरील प्रचार बोढारेंच्या खांद्यावर..
हिंगणा तालुक्यातील पठारावरील खडकी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये येणाऱ्या कवडस, चिंचोली पठार व खैरी पन्नासे या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद माजी सभापती उज्वला बोढारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे यांच्या खांद्यावर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या तीनही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता काबीज करण्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमरी वाघ ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्य अविरोध निवडून आले आहे. केवळ सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. यामुळे उपसरपंचपद राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता आहे. पठारावरील मतदार आता कुणाला संधी देतो, हे येणारी वेळ सांगेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.