Ravikant Tupkar with Farmers.
Ravikant Tupkar with Farmers. Sarkarnama
विदर्भ

मूठ आवळून शेतकरी तुपकरांच्या पाठीशी, १२ नोव्हेंबरपासून पेटणार आंदोलनाचा वणवा...

सरकारनामा ब्यूरो

बुलडाणा : शेतकरी रात्र अन् दिवस शेतीत कष्ट उपसतोय. मात्र, त्याच्या सोयाबीन, कपाशीला घामाचे योग्य दाम मिळत नाही. आर्थिकदृष्ट्य़ा खंगून खंगून तो मरणाच्या वाटेवर आहे. जगाचा पोशिंदा म्हणवणाऱ्या बळीराजाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी १२ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात आंदोलनाचा वणवा पेटवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Swabhimani Shetkari Sanghatna's Leader Ravikant Tupkar) यांनी काल दुपारी निघालेल्या एलगार मोर्चादरम्यान हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने केली.

सोयाबीनला ८ हजार, कापसाला १२ हजार रुपये प्रतिक्विटंल भाव मिळावा आणि हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याच्या हक्काच्या लढाईकरिता रविकांत तुपकर यांनी आंदोलनासाठी साद घालताच उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी आपल्या हाताच्या मुठी आवळून त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे असल्याची ग्वाही दिली. कास्तकारांना न्याय देताना आपला जीव गेला तरी बेहत्तर, पण हे शेतकऱ्यांची पोरं मागे हटणार नाहीत, असे वचन तुपकर यांनी यावेळी दिले.

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विराट मोर्चा रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात काल ३१ ऑक्टोबरला दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महिला, पुरुष शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन रविकांत तुपकर यांना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासनाविरोधात लढण्याकरिता एकप्रकारे मोठे बळ दिल्याचे यावेळी दिसून आले. हा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा ठरला. कानाकोपऱ्यातून असंख्य वाहनांनी शेतकरी आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते सकाळपासूनच जिल्हा मुख्यालयी दाखल झाले होते. डीएड कॉलेजच्या प्रशस्त प्रांगणात शिस्तीने वाहने लावल्यानंतर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोठ्या देवीपासून शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. जगदंबा देवीची आरती करून व साकडे घालून मोर्चाची सुरुवात झाली.

हाती रुह्मणे घेतलेले शेतकरी, बैलगाड्या आणि ट्रॅक्टर्सदेखील मोर्चात सामील झाले होते. त्यावर सोयाबीनचे काड आणि कपाशीची झाडे बांधलेली होती. निगरगट्ट सरकारच्या नावाने बडवल्या जाणाऱ्या ढोलताशांचा, डफड्यांचा प्रचंड गजर कानी आदळत होता. महागाई जीव घेत असल्याने त्याचा जिवंत देखावा म्हणून मनोज जयस्वाल हा युवक यमाचे रूप घेऊन मोर्चात आला होता. स्टेट बॅंकेजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विदर्भाध्यक्ष दामुअण्णा इंगोले, अमित अढाव, प्रवीण मोहळ, कुलदीप करपे, किशोर ढगे, शैलेश ढोबळे, प्रदीप शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण शेतकरी महिला सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT