Sunil Mendhe and Parimay Fuke
Sunil Mendhe and Parimay Fuke Sarkarnama
विदर्भ

बड्या नेत्याचा मुख्याधिकाऱ्यांना फोन, मित्राने सोडली साथ; अन् खासदार पडले एकाकी...

Abhijeet Ghormare

भंडारा : शेक्सपिअरने म्हटले आहे की, नाम मे क्या रखा है. मात्र नावावरून भंडाऱ्याचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. भंडारा जिल्ह्यात "खांब तलाव सौंदर्यीकरण सोहळा" चर्चेचा विषय ठरला आहे. ह्या लोकार्पण सोहळ्यावरून राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा जोडल्याने लोकार्पण सोहळा कार्यक्रम रद्द करण्याची नामुश्‍की ऐन वेळी भंडारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर आली. मात्र नगराध्यक्ष व खासदार यांनी स्वतः लोकार्पण करून घेतल्याने नवीन वादाला तोड फुटले आहे. मात्र असे करताना सच्चा मित्राने साथ न दिल्याने भंडारा भाजपमध्ये वर्चस्वासाठी अंतर्गत गटबाजी निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसते आहे.

भंडारा शहरातील खांब तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी एमटीडीसी मार्फत 4 कोटी 64 लाख रुपयांचा निधी मंजूर करून एक सुंदर उद्यान तयार करण्यात आले असून काल गुरुवारी त्याच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी निमंत्रण पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. स्वतः नगराध्यक्ष तथा भाजपचे खासदार सुनील मेंढे उद्घाटक असल्याने लगेच जिल्ह्यात गाजावाजाही सुरू झाला होता. मात्र भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे नाव त्या पत्रिकेत नसल्याने संतापलेल्या त्या नेत्याने चक्क मुख्याधिकाऱ्याला फोन करत आपला संताप व्यक्त केला आणि कार्यक्रम सोहळा रद्द झाला.

सावरा सावर म्हणून कार्यक्रम रद्द करण्याची नामुश्की भंडारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर आल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. ऐन वेळी कार्यक्रम रद्द झाल्याने नगराध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे यांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न बनला. त्यांनी स्वतः जसा कार्यक्रम पाहिजे होता, तसा तो करवून घेतला. मात्र यावेळी मुख्याधिकारी विनोद जाधव, आमदार नरेंद्र भोंडेकर व भाजप आमदार डॉ परिणय फुके यांचे नाव पत्रिकेत असूनही ते उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याने आपले अस्तित्व परत एकदा दाखवून दिल्याने त्याचीच चर्चा जिल्ह्यात रंगली असताना भाजपमध्ये मात्र अंतर्गत गटबाजी सुरू असल्याची ओरड होऊ लागली आहे. भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत असतानाही ते ह्या कार्यक्रमात उपस्थित नव्हते. इतकेच काय परिणय फुके यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा ह्या कार्यक्रमाला दांडी मारली होती.

अशा बिकट प्रसंगी खासदार सुनील मेंढे एकटेच पडल्याने ऐन संकट समयी सच्चा मित्र ऐन वेळी पक्का वैरी झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. नाना पटोले सोडून गेल्यानंतर भाजपमध्ये जिल्ह्यात एक मुख्य नेतृत्व राहिलेले नाही. खासदार सुनील मेंढे नितीन गडकरी यांचे खास तर डॉ परिणय फुके माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचे खास असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच की काय दोन्ही जिल्ह्यांचे नेतृत्व आपणच करावे, यातून मेंढे-फुके यांच्यात वाद असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. परिणय फुके यांची कालची अनुपस्थिती खूप काही बोलून जात आहे. असो राजकारणी लोकांच्या दृष्टीने हा लोकार्पण सोहळा आनंदाचा ठरला नसला तरी भंडारा शहरवासीयांसाठी हा सोहळा मात्र सुखद ठरला आहे. त्यामुळे का होईना लोकांना आता हक्काचे उद्यान मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT