Pravin Togadia
Pravin Togadia Sarkarnama
विदर्भ

केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी चुकीचा मार्ग निवडला, रामराज्यात हे अपेक्षित नव्हते...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : केंद्रातील सध्याचे सत्ताधारी हे रामाच्या नावावर सत्तेत आले. रामराज्य आणू, अशा वल्गना त्यांनी केल्या होत्या. पण सत्ताधाऱ्यांनी चुकीचा मार्ग निवडला. रामराज्यात हे अपेक्षितच नव्हते, असे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया (Pravin Togadia) आज येथे म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना तोगडीया म्हणाले, अयोध्येत राम मंदिर होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. पण, आज रामाच्या नावावर सत्तेत आलेले रामराज्य विसरले आहे, अशी टिका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव न घेता केली.भारताला अमेरिका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला भारतात रामराज्य हवे आहे. आर्थिक विकासाच्या नावाखाली हिंदूंचा बळी दिला जात आहे. मूठभर भांडवलशहांच्या हातात संपत्ती एकवटली जात आहे. तर गरीब आणखी गरीब होत आहे. बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. रामराज्यात हे अपेक्षित नव्हते, असे तोगडीया म्हणाले.

भारतीय लोकसंख्येत असंतुलन निर्माण होत चालले आहे. विशेषतः हिंदूंच्या लोकसंख्येत हे असंतुलन प्रकर्षाने जाणवते. विविध धर्मांतील लोकांचा जन्मदर देखील वेगवेगळा आहे. हे लक्षात घेता, केंद्र सरकारने दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्यावर बंदी आणणारा कायदा आणवा, अशी मागणीही तोगडीया यांनी केली. केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या जन्मदर वृद्धी अहवालातून हिंदूंचा जन्मदर २ टक्क्यांवर स्थिरावला आहे. असेच सुरू राहिले तर १४० कोटींवरून हिंदूंची लोकसंख्या १०० कोटींवर यायला वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले. मुस्लिमांचा जन्मदर २.५० टक्के असून याच वेगाने त्यांची लोकसंख्या वाढत राहिली तर भारत इस्लामिक स्टेट व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा तोगडीयांनी दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विहिंपचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस तसेच महंत अवैद्यनाथ यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणीही तोगडीया यांनी केली. अगदी सुरुवातीच्या काळात राम मंदिरासाठी कोणीही पुढे येऊन जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. अशा काळात या चौघांनी हिंदू जनजागरण करीत अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी वातावरण निर्मिती केली. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात यावा, असे तोगडीया म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT