Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

मुख्यमंत्री म्हणाले, गुन्ह्याला वाचा अन् गुन्हेगाराला होणार हमखास शिक्षा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी आज वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने केले. या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील Home Minister Dilip Walse Patil उपस्थित होते.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात आज उद्घाटन झालेल्या फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डिएनए विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणे, गुन्ह्याला वाचा फोडणे व गुन्हेगाराला कडक शासन करणे या प्रक्रियेला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

नागपूर येथे राज्याच्या गृह विभागामार्फत रहाटे कॉलनीस्थित प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजिवांच्या पहिल्या तर मानवी डिएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने केले. या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार, गृह विभागाच्या न्यायिक व तांत्रिक शाखेचे महासंचालक संदीप बिश्नोई, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेच्या संचालक संगीता घुमटकर, उपसंचालक डॉ. विजय ठाकरे नागपूर येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभूराज देसाई उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये भारतातील वन्यजिवांच्या पहिल्या तर निर्भया योजनेंतर्गत मानवी डिएनएच्या एकत्रित तीन प्रयोगशाळांचे उद्घाटन करताना गृह खात्याच्या कामकाजाला बळकटी देत असल्याचा आनंद आहे, असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, महिला व बालक यांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करताना अडचण येते. या प्रयोगशाळेमुळे तपासाला गती येणार आहे. वन्यजिवांच्या हत्येप्रकरणी तस्करी रोखताना, अशा तस्करांवर कारवाई करताना आता ही प्रयोगशाळा कामी येणार आहे. आपले तंत्रज्ञान हे गुन्हेगारांच्या पुढे असले पाहिजे. त्यामुळे जगातील बदल लक्षात घेऊन आज फास्टट्रॅक मुंबई, नागपूर, पुणे येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले जात आहे. महाराष्ट्राचे पोलीस, मुंबई पोलीस यांचा संपूर्ण देशात दरारा आहे. तपासामध्ये या नव्या प्रयोगशाळेचा निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हिवाळी अधिवेशनात संमत होईल शक्ती कायदा

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही संबोधित केले. राज्यात लवकरच महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, महिला व मुलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी महाविकास आघाडीने शक्ती कायदा तयार केला आहे. हा कायदा लवकरच संमत केला जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यासाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटची मोठी भूमिका राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. निसर्गातील समतोल राखण्यासाठी वन्यजिवांचे रक्षण करणे आवश्यक आहे. वाघांसह इतर लहान-मोठ्या प्राण्यांची शिकार केली जाते. यामुळे निसर्गातील समतोलावर विपरीत परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी व या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग मोलाची भूमिका बजावणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

तपासाचा कालावधी कमी होणार : नितीन राऊत

ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रयोगशाळेमुळे तपास यंत्रणेच्या नव्या पर्वाला सुरुवात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, या युनिटमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यास लागणारा कालावधी कमी होणार आहे. एवढेच नव्हे तर तपासामध्ये अधिक अचूकता येणार आहे. महिलांची सुरक्षितता ही महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर त्वरित कारवाई करून कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. या युनिटमध्ये वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागही सुरू होणार आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे. वन्यजिवांचे संरक्षण करण्याच्या कामात हे युनिट मोठी भूमिका बजावणार आहेत.

प्रयोगशाळा अधिक अद्ययावत : सुनील केदार

डीएनए विश्लेषण विभाग सुरू झाल्याने नागपुरातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक अद्ययावत झाली आहे, असे मत राज्याचे पशू संवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना केदार म्हणाले, जे बघता येत नाही, जे दिसत नाही, ते सर्व येथे पुरावा म्हणून पुढे येते. फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्य डीएनए विश्लेषण विभागामुळे पोलिस व वनविभागाच्या तपास यंत्रणेला नक्कीच लाभ होईल, असेही श्री. केदार यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी संचालक संगिता घुमटकर, संचलन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विजय ठाकरे यांनी केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT