Nana Patole on Modi
Nana Patole on Modi Sarkarnama
विदर्भ

नानांनी शिव्या दिलेला मोदी नामक तो गुंड अखेर आज नागपुरात अवतरला...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भंडारा-गोंदिया (Bhandara) जिल्हा परिषद निवडणुकीतील (ZP Election) मतदानाच्या आदल्या रात्री नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारुही शकतो’, असे वक्तव्य प्रचारादरम्यान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टिकेची झोड उठली. नानांनी घूमजाव करीत ‘पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल नव्हे, तर गावगुंड मोदी याच्याबद्दल बोललो होतो’, अस खुलासा केला. त्यानंतरही अनेक प्रश्‍न अनुत्तरित राहिले होते. अखेर नानांनी आज त्यांचे वकील सतीश उके यांच्या माध्यमातून त्या गावगुंड मोदीला माध्यमांसमोर हजर केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या मोदी बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, तो गावगुंड मोदी आज अखेर नागपुरात अवतरला. काँग्रेस समर्थीत वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणलं. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना या मोदीला चांगलाच घाम फुटला. भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्यानं नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा ॲड. सतीश उके यांनी केला. मुळात या मोदीचं मुळं नाव उमेश घरडे ऊर्फ मोदी असं आहे. अनेक लोक त्याच्या मागे लागले त्यामुळं तो घाबरून आपल्याकडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचं उके यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले

तथाकथित मोदी याला मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना चांगलाच घाम फुटला. आपण दारू विकत होतो, दारू पितो, पत्नी आपल्याला सोडून गेली, आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असं सांगत 2020 पासून आपल्याला मोदी असं टोपण नाव पडल्याचं सांगितलं. मात्र, मोदी नाव कसं पडलं, हे मात्र सांगण्यास नकार दिला. पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तर अर्ध्यावर सोडून या मोदीनं अक्षरशः पळ काढला. त्यामुळं खरंच नानांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हाच होता, की तो हाच आहे, असा केविलवाणा प्रयत्न नाना पटोलेंनी आपल्या वकीलाच्या मार्फत केला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उमेश घरडे नामक व्यक्ती पालांदूर तालुक्यातील गोंदी या गावात राहतो. या परिसरात तो मोदी या नावानेच ओळखला जातो. या प्रकरणाची चौकशी आम्ही केलेली आहे आणि त्या अहवाल वरिष्ठांना सादर केलेला आहे, असे पोलीसांनी या तथाकथित मोदी बद्दल सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT