नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय (Political) जीवनात फुके कुटुंबीयांची एक वेगळी ओळख आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिक गोविंदरावजी फुके यांनी स्वातंत्र्य चळवळीत फार मोठे योगदान दिले. सरदार वल्लभभाई पटेल काही काळ भूमिगत होते. त्यावेळी काटोल तालुक्यातील जुनोना या गावात फुके कुटुंबीयांनी वल्लभभाई पटेल यांना आश्रय दिला होता. हा वारसा रमेशराव फुके आणि त्यांच्या भावंडांनी विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करून पुढे चालवला. दिवंगत ॲड. संकेत फुके हे मात्र फुके कुटुंबीयांचा वारसा असलेल्या राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिले.
वडील रमेशराव फुके हे नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व. सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांचे घरोब्याचे संबंध. तो वारसा डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) यांनी पुढे चालवला. ते आमदार झाले, पुढे मंत्री झाले. मोठे बंधू परीक्षित फुके यांनी व्यवसायात मोठे यश मिळविले. परंतु लहान बंधू ॲड. संकेत यांनी आपली वेगळी वाट चोखाळली. संकेत यांना विधी क्षेत्रात करिअर करायचे होते. ते एलएलबी झाले. पण त्यांच्यातील खेळाडू त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. टेनिस आणि जलतरण हे त्यांचे आवडते खेळ. या खेळांत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार पटकावले आणि टेनिस आणि जलतरण पटू म्हणून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला.
अत्यंत मितभाषी, परंतु पहिल्याच भेटीत मित्रांना जिंकणारे असे ते व्यक्तिमत्त्व होते. वडील आणि भावाच्या राजकारणात ते सक्रिय नव्हते. परंतु आपल्या अफाट जनसंपर्काच्या बळावर संकेत यांच्या लोकसंग्रहाची सगळ्यांनाच मदत व्हायची. क्रीडा क्षेत्रात फार मोठे भवितव्य दिसत असतानाच २००९ मध्ये त्यांना किडनीच्या आजाराने ग्रासले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. आई प्राचार्य रमाताई यांनी संकेतला एक किडनी दिली. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या गंभीर आजारावर मात करीत संकेतचे सामाजिक कार्य आणि सोबतीला व्यवसाय यशस्वीरीत्या सुरू होते आणि या लोकसंग्रहामुळेच संकेत यांनी आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.
तब्येतीच्या कारणास्तव फारशी धावपळ होत नव्हती. पण अनेक सामाजिक संस्थांना, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संकेत मदत करायचे. सकाळी फिरायला जाणाऱ्या अनेक मान्यवरांच्या मॉर्निंग क्लबचे संकेत हे महत्वाचे सदस्य होते. त्यात पोलिस अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर होते. आज संकेत यांना दुपारी अंबाझरी घाटावर अखेरचा निरोप देताना जमलेला अफाट जनसमुदाय त्यांच्या लोकसंग्राहक स्वभावाची साक्ष देणारा होता. दीड महिन्यापूर्वी साधा ताप आल्याचे निमित्त झाले आणि तापाचे पर्यवसान फुफ्फुसाच्या संसर्गात झाले.
मुंबईत तब्बल दीड महिना संकेत यांनी जीवन-मृत्युशी झुंज दिली. ही झुंज देत असताना हा राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू शेवटच्या क्षणी सामना आपल्याकडे फिरवेल आणि जिंकेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण नियतीला ते मान्य नव्हते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री १० वाजता सर्वांचा लाडका संकेत कायमचा सर्वांना सोडून निघून गेला. ४० वर्षे हे काही जाण्याचे वय नव्हेच. पत्नी प्रिया, ७ वर्षाचा विराज आणि ४ वर्षाची प्रिशा या दोन चिमुकल्यांसह फुके कुटुंबीयांवर झालेला आघात सहन करण्यापलीकडचा आहे. फुके कुटुंबीयांवर आलेलं हे मोठं संकट आहे. आपल्या लाघवी स्वभावामुळे सर्वांना हवाहवासा वाटणारा संकेत देवालाही हवाहवासा वाटावा, हे दुःख कधीही भरून निघणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.