नागपूर : सततचा पाऊस आणि पुरपरिस्थितीमुळे नागपूर जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात हाहाकार उडाला आहे. पण सरकार असंवेदनशील झाले आहे. नागपुरचे पालकमंत्री तर केवळ एका गावापुरते राहिलेले आहे. जिल्ह्याचे त्यांना काहीचे देणेघेणे दिसत नाही, असा घणाघाती आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन राऊत यांचे नाव न घेता केला.
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या सात दिवसांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. तरीही प्रशासन पंचनामे करायला तयार नाही. कारण सरकार त्यांना तसे आदेश देत नाही. अशा पूरपरिस्थितीमध्ये ड्रोन कॅमेरे वापरून पाहणी करायला पाहीजे. पण टेक्नॉलॉजीचा कुठेही वापर होताना दिसत नाही. सरकार काहीच करत नाही, याचा विश्वास लोकांना असल्यामुळे सरकारकडे कुणी मागणीच केलेली नाही. नागपूरचे पालकमंत्री केवळ आपल्या गावापुरते काम करताना दिसतात. जिल्ह्याचे त्यांना काही देणेघेणे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली, ती पूर्ण होणार नाही, असे चित्र आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांपैकी एकही घोषणा पूर्ण झालेली नाही, असे बावनकुळे म्हणाले.
आज शेतकऱ्यांचा कापूस गेला, सोयाबिन गेले. तरीही सरकार जागचे हललेले नाही. आता मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांत सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी. कारण आत्ताच शेतकऱ्यांना खरी मदतीची गरज आहे. पुढे दसरा, दिवाळीसारखे सण आहेत. शेतकरी आत्महत्या करण्याच्या स्थितीत आले आहेत. पण सरकार ढिम्म होऊन हे सर्व बघत आहे. खरे तर अशी पुरपरिस्थिती असताना आतापर्यंत सरकारने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता. पण आपसातल्या भानगडी मिटवायलाच यांना वेळ कमी पडतो. तर जनतेच्या समस्यांकडे हे कसे बघणार, असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.
विषय ओबीसी आरक्षणाचा असो की धान, कापुस उत्पादकांचा हे सरकार काहीच करणार नाही, याचा विश्वास आता जनतेला बसला आहे. सत्तेत आल्यापासून आतापर्यंतचा काळ यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यात वाया घालवला. अस्मानी संकटांकडे तरी संवेदनशीलपणे बघायला हवे. पण तसे होताना दिसत नाही. या ओल्या दुष्काळातून शेतकरी जर सावरू शकला नाही, तर त्यांच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. सामान्य जनता आणि शेतकरी पुन्हा एका दुष्टचक्रात अडकत चालले आहे. आता तरी सरकारने डोळे उघडावे नाहीतर जनता या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.