Mohan Makde, Bhilgaon Nagpur
Mohan Makde, Bhilgaon Nagpur Sarkarnama
विदर्भ

तलावाचा बांध फुटला; शेतांवर राखेची चादर, तीन वर्षे पिकणार नाही शेती...

सरकारनामा ब्यूरो

कामठी : कोराडी वीज केंद्राच्या राख तलावाचा बांध काल सकाळी १० वाजता फुटला. अन् पाहता पाहता पाच ते सहा गावांमध्ये पाणी शिरू लागले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. पण पाणी जायला एक नव्हे तर चार मार्ग होते. त्यामुळे जीवित हानी टळली. मात्र शेतांचे मोठे नुकसान झाले. पिकांवर (Crop) राख जमा झाली. त्यामुळे सध्याचे पीक तर हातून गेलेच पण पुढील तीन वर्षे शेती पिकणार नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी येरखेडा-भिलगावचे जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांनी केली आहे.

यात नागपूर (Nagpur) शहरानजीक खसाळा, उप्पलवाडी व कवठा म्हसाळासह इतर गावांत पाणी शिरले असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. निकृष्ट बांधकामामुळे बांध फुटल्याचा आरोप होत आहे. तर पाणी भरल्यामुळे या मार्गावरील रेल्वे (Railway) मार्गही बंद करण्यात आला. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिसरातील नदी, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. खसाळा येथे २०१५ पासून ६५ कोटी खर्च करून हा राखेसाठी बंधारा बांधण्यात आला. याचे कंत्राट अभी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. या कंपनीने निकृष्ट बांधकाम केल्याने या बंधाऱ्यात अनेक ठिकाणी तडे गेले होते, असा आरोप मोहन माकडे यांनी केला. अखेर अतिवृष्टीने पाण्याची पातळी वाढल्याने हा बंधारा काल फुटला.

खसाळा, म्हसाळा, खैरी, कवठा गावांमध्ये याचे पाणी शिरले. या परिसरातील वीटभट्टी, शेतीचा परिसर जलमय, राखमय झाला, तर नागपूर- कोराडी रेल्वेमार्ग बंद करण्यात आला आहे. खसाळा राख बंधारा ३४१ हेक्टर क्षेत्राचा असून सुमारे ७ किलोमीटर आतील जागेत राख साठवण्यात येते. दुपारी साडेतीनच्या सुमारास पाण्याचा विसर्ग कमी झाला. पाण्याचा विसर्ग थांबविण्यासाठी वीज केंद्राकडून युद्धपातळीवर काम करण्यात आले.

ग्रामस्थांनी केली होती कंत्राटदाराची तक्रार..

अभी कन्स्ट्रक्शन कंपनीने निकृष्ट बांधकाम केल्याने या बंधाऱ्याला अनेक ठिकाणी तडे गेले होते. याची तक्रार परिसरातील सरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी महाजेनको कोराडी व खापरखेडा पॉवर प्लांटचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना केली होती, असे सांगण्यात येते. प्रकल्प अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीही माकडे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT