MP Sunil Mendhe
MP Sunil Mendhe Sarkarnama
विदर्भ

अधिकारी माफियांसोबत सामील झाल्याने सर्वसामान्यांचे जीव धोक्यात…

Abhijit Ghormare_Guest

भंडारा : रेतीचा ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातानंतर गोंदिया जिल्ह्यातील परिस्थिती चिघळली असून याला सर्वस्वी प्रशासन दोषी आहे असा आरोप करीत खासदार सुनील मेंढे यांनी प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत देण्यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील गोंदिया धापेवाडा तिरोडा या मार्गावर महालगाव येथे 15 जून रोजी ट्रॅक्टर आणि रेतीचा ट्रक यात भीषण अपघात होऊन ट्रॅक्टर मधील दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. काल मृतांचे नातेवाईक व गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर आणून आंदोलन केले. प्रशासनाने त्यांना सांत्वना देण्याऐवजी पोलिसांकरवी (Police) आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक आहे. खरेतर रेतीचे ट्रक प्रशासनाच्या बेजबाबदार व्यवहारामुळे अवैधपणे सुरू आहेत, असा आरोप खासदार मेंढे (MP Sunil Mendhe) यांनी केला.

तिरोडा घाटावरील गैर व्यवहाराची तक्रार मी स्वतः २२ मे व १० जून रोजी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु तक्रारीची अजूनही साधी चौकशी करण्यात आली नाही. मी मागितली ती माहितीही अद्याप दिली नाही. शासनातील अधिकारी रेती माफियांना सामील असल्याने सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आले असल्याचे खासदार मेंढे म्हणाले. आता या प्रकारावर उपाययोजना करण्यासाठी योग्य ती पावले उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पवनी येथ उपविभागीय अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला रेती माफियांची हिंम्मत वाढल्याचे दाखवते, असेही खासदार मेंढे यांनी निदर्शनास आणून दिले. झालेला अपघात हा अधिकाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे व रेती माफियांसोबतच्या मिलीभगतमुळे झाला असून त्यामुळे दोन जीवांना प्राण गमवावे लागले. दुखी कुटुंबीयांना व आंदोलनकर्त्यांना पोलिसांचा मारही खावा लागला. त्यामुळे दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी आणि पीडितांना सांत्वना म्हणून भरघोस आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT