Police Bandobast in Akola Sarkarnama
विदर्भ

Strong Decision : पोलिसांच्या नोटीसला नाही घाबरणार; नेत्यांच्या घरापुढं आंदोलन करणार

जयेश विनायकराव गावंडे

Protest in Akola : सध्या राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण पसरले आहे. आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनांमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनानं या आंदोलनावर लक्ष केंद्रित केलेय. अकोला येथेही मराठा समाजाच्या वतीने विविध पद्धतीनं आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी (ता. २) जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. पोलिस प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारलीय. मात्र, हे आंदोलन करणारच असा इशारा मराठा समाजाने दिलाय. त्यामुळं पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना नोटीसही पाठवलीय.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळं आता मराठा समाज रस्त्यावर येत आंदोलनं करीत आहे. याचा धसका घेत पोलिसांनी खासदार, आमदार, मंत्र्यांच्या घरासमोरील बंदोबस्तात वाढ केलीय. अकोल्यातील खासदार, आमदारांच्या घरासमोरही आत्मक्लेश आंदोलन होणार असल्यानं पोलिसांनी ‘अलर्ट’ भूमिका घेतली. आंदोलनाची परवानगी नाकारत पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. (The Maratha community will protest in front of the houses of MPs and MLAs in defiance of the notice issued by the Akola police)

पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना बलजावलेल्या नोटीसमध्ये जिल्ह्यात जमावबंदी लागू असल्याचं म्हटलंय. अशात गर्दी जमवून आंदोलन केल्यास व त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आंदोलनाकर्त्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. गुरुवारी सकाळी भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी, शिंदे गटाचे आमदार विप्लव बाजोरिया, भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांची प्रकृती ठीक नसल्यानं मानवीय दृष्टिकोनातून त्यांच्या घरासमोर आंदोलन होणार नसल्याचे मराठा समाजाकडुन स्पष्ट करण्यात आलंय. मराठा आंदोलनामुळं जिल्ह्यातील या सर्वच नेत्यांच्या घरापुढं पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिस अधीक्षक संदीप घुगे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीला दंगल नियंत्रण पथक व राज्य राखीव पोलिस दलाचीही मदत घेतली जात आहे.

मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय कार्यक्रमांचे आयोजनही थंडावले आहे. कोणतीही राजकीय सभा, संमेलन झाल्यास ते उधळण्यात येईल, असा इशारा देण्यात आलाय. मंत्र्यांना जिल्हाबंदी व राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्यानं नेत्यांनीही आपले दौरे पुढे ढकलले आहे. निवडणूक जवळ येण्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या तिढ्यावर तोडगा निघावा, अशी अपेक्षा सर्वच राजकीय पक्षाचे नेते करीत आहेत.

(Edited By : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT