Akola Municipal Corporation
Akola Municipal Corporation Sarkarnama
विदर्भ

जुनी प्रभाग रचना जवळपास मोडीत; इच्छुकांची धाकधूक वाढली!

मनोज भिवगडे

अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या २० किंवा ३० याबाबत चर्चा सुरू असतानाच राज्य शासनाचा प्रभाग रचनेबाबतचा नवीन आदेश धडकला. या आदेशाने जुनी प्रभाग रचना जवळपास मोडीत निघाली आहे. प्रशासनाला आता लोकसंख्येच्या आधारावर नवीन प्रभाग रचना करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून मिळाल्या आहेत. त्या नेमके किती प्रभाग राहणार याची माहिती नसल्याने इच्छुकांची धाकधूक आणखीच वाढली आहे.

महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकीची तयारी गेले वर्षभरापासून सुरू आहे. मार्च २०२२ मध्येच अकोला (Akola) मनपाची मुदत संपली. त्यानंतर तीन वेळा प्रभाग रचना करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) प्रलंबित याचिकेमुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकला नाही. त्यातच आता राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रभाग रचनेसंदर्भातील पत्र काल २२ नोव्हेंबर रोजी मनपात धडकले. या पत्रानुसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने प्रभाग रचना होणार हे आता निश्चित झाले आहे.

काय आहे पत्रात?

मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मध्ये संदर्भिय अधिनियमानुसार सुधारित केलेल्या तरतुदीप्रमाणे मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या, रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी, असा उल्लेख नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी दिलेल्या पत्रात आहे.

सदस्य संख्या ८० की ९१?

अकोला महानगरपालिकेची मुदत संपण्यापूर्वी २० प्रभागात ८० सदस्य संख्या होती. चार सदस्यीय प्रभाग होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आलेल्या आदेशानुसार अकोला मनपाची वाढीव लोकसंख्या गृहीत धरून सदस्य संख्या ८० वरून ९१ करण्यात आली होती. प्रभागांची रचनाही बहुसदस्यीय रचनेप्रमाणे तीन सदस्यीय प्रभाग रचना अंतिम करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ९१ सदस्य संख्येचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे ८० सदस्य संख्येनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. हा आदेशही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रलंबित राहिला. आता नव्याने प्रभाग रचना करण्यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यात नेमकी किती सदस्य संख्या राहील याबाबत काहीही स्पष्टता करण्यात आली नाही. त्यामुळे अकोला मनपाची प्रभाग रचना ८० की ९१ सदस्य गृहीत धरून केली जाईल, याबाबतचा संभ्रम कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT