Students in School
Students in School Sarkarnama
विदर्भ

सरकारच्या निर्णयामुळे पालक बुचकळ्यात, म्हणाले ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांना धोका नाही का?

मंगेश गोमासे

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशात पालकमंत्री नितीन राऊत यांनी पहिली ते आठवी आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नववी ते बाराव्या वर्गांतील विद्यार्थ्यांना (Students) शाळेत जायचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोरोनाची (Corona) भिती नाही का, असा सवाल पालकांनी केला आहे. सरकारच्या या निर्णयाने सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे.

आठवड्याभरापासून राज्यात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. शहरात गेल्या सहा दिवसात एक हजारावर रुग्णांची भर पडली. त्यामुळे प्रशासनाने कठोर नियम लावण्याचे संकेत दिले. त्यातूनच राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत तर शहरासह कामठी, हिंगणा, कळमेश्‍वर सावनेर या भागात पालकमंत्र्यांनी ३१ जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप शहरासह ग्रामीण भागात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा पन्नास टक्के उपस्थितीस सुरू आहेत.

विशेष म्हणजे बहुतांश खासगी शाळांमधील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, अद्यापही विद्यार्थी केवळ दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये असल्याने शाळेच्या चकरा मारत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संक्रमण होण्याची शक्यता अधिक आहे. कोरोना झाल्यास त्यांना परीक्षांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याही शाळा बंद केल्या तर संभावित धोका टाळता येऊ शकतो, असे मत पालकांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे कोरोना काय पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाच होईल काय? असा सवालही त्यांनी केला आहे. याशिवाय काहींनी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण करणारा हा निर्णय असल्याचीही प्रतिक्रिया दिली.

पालकमंत्र्यांचा निर्णय तर्कसंगत असल्याचे दिसत नाही आणि विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणारा आहे. एकाला शिक्षण द्यायचे आणि दुसऱ्याला शिक्षणापासून वंचित करणे योग्य नाही.

- पुरुषोत्तम पंचभाई, मार्गदर्शक, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघ

सर्व विद्यार्थी समान आहेत. त्यामुळे प्रशासनानेही हा निर्णय घेताना सर्व विद्यार्थ्यांना एकच निकष लावावा. मात्र, दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा असल्याने त्यांची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्यांचे करिअर महत्वाचे आहे.

- दीप्ती बिष्ट, शिक्षिका

कोरोना हा नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाही होवू शकतो. त्यामुळे त्यांच्याही शाळा बंद करणे आवश्‍यक आहे. केवळ बोर्डाच्या परीक्षा आहे म्हणून शाळा सुरू ठेवणे योग्य नाही.

- शुभांगी पोहरे, शिक्षिका.

नववी ते दहावीच्या शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय असला तरी आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही. त्याची सुरक्षिततेसाठीच आमची ही भूमिका आहे.

- सीमा बडगय्या, पालक

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आम्ही विद्यार्थ्यांना गेल्या आठवड्यापासून शाळेत पाठविले नाही. त्यामुळे प्रशासनाने तो निर्णय घेतला असला तरी त्याने फरक पडत नाही.

- पंकज आष्टणकर, पालक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT