Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

बॅनरवर कॉंग्रेस नेत्यांचा फोटो टाळला, बच्चू कडूंना कॉंग्रेसचे वावडे ?

जयेश गावंडे

अकोला : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील ७५ हजार युवक युवतींचे रोजगार नोंदणी अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुरू करण्यात येत आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावतीने शहरासह जिल्ह्यात तसे बॅनर लावण्यात आले. पण या बॅनरवर कॉंग्रेसच्या नेत्याचा फोटो नसल्यामुळे कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आणि बच्चू कडूंना कॉंग्रेसचे वावडे आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला.

तीन पक्षाचे सरकार असलेल्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसला सापत्न वागणूक दिल्याचा प्रकार अकोल्यात घडला. अकोल्यात पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे फोटो लावण्यात आले आहेत. मात्र राज्यपातळीवरील काँग्रेसच्या एकाही नेत्याचा वा मंत्र्याचा फोटो न लावल्याने काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी नाराज असल्याची माहिती आहे. दरम्यान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी या प्रकाराची तक्रार बच्चू कडू आणि काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. त्यावर नवीन बॅनर तयार करून त्यावर कॉंग्रेस नेत्यांचा फोटो लावण्याचे आश्‍वासन पालकमंत्री कडूंनी दिल्याचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी सांगितले.

पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 75 हजार बेरोजगार नोंदणी अभियान आयोजन केले आहे. याची जाहिरात म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनर वरून काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचा फोटो नसल्याने काँग्रेस पदाधिकारी नाराज आहेत. दरम्यान याची तक्रार काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी केली आहे. तीनही पक्षाचे सरकार असताना मुख्यमंत्र्यांचा फोटो लावला जातो, उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावला जातो. मग केवळ काँग्रेसला अशी सापत्न वागणूक का, असा प्रश्न काँग्रेसकडून विचारला जात आहे.

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमानकर यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांना बॅनरवर कॉंग्रेस नेत्याचा फोटो लावण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यानुसार नवीन बॅनर तयारही झाले. त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो छापण्यात आला. ते बॅनर ‘सरकारनामा’ला उपलब्ध करून देण्यात आले. पण अद्याप ते कुठे झळकले नाही. कॉंग्रेस नेत्यांचा फोटो असलेले बॅनर तयार आहे, तर मग लावायला विलंब का, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीमधील तीन पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे वारंवार बघण्यात आले आहे. आता रोजगार नोंदणी अभियानाच्या निमित्ताने अकोल्यातही त्याची प्रचिती आली. या प्रकारामुळे महाविकासमधील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT