Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

चंद्रशेखर बावनकुळेंची मते कमी करण्याचा असा होता प्लॅन... पण तो फसला !

अतुल मेहेरे

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) आपले मतदार सदस्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या रिसॉर्टवर ठेवले होते. ते आज मतदानासाठी परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या बसेस अडवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची मते कमी करण्याची पूर्ण फिल्डींग लावण्यात आली होती. पण ‘केअर टेकर’च्या सतर्कतेमुळे प्लॅन फसला.

आपली मते वाढू शकणार नाही, तर मग विरोधकांची मते कमी करायची. या सूत्रावर बावनकुळेंची मते कमी करण्यासाठी विरोधक सक्रिय झाले होते. विधान परिषद निवडणुकीचे मतदार असलेल्या बसेस थांबवायच्या आणि त्यांची कोरोना तपासणी करण्याच्या नावाखाली थांबवून ठेवायच्या. तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांना क्वारंटाईन करायचे, असा विरोधकांचा प्लॅन होता. पण ही माहिती मतदारांसोबत असलेल्या केअर टेकरला मिळाल्यामुळे त्यांनी ऐन वेळेवर प्रवासाचा मार्ग बदलविला आणी दुसऱ्या मार्गाने ते नागपुरात मतदान केंद्रावर पोहोचले.

जे सदस्य सहलीवर गेले होते. त्यांच्यापैकी तीन बसेस टारगेटवर होत्या. इतर काही शक्य झाले नाही, तरी या तीन बसेस अडवण्याची ‘फिल्डींग’ लावली होती, असेही सूत्रांनी सांगितले. पण वेळीच भनक लागल्यामुळे शिवणी मार्गाने बसेस बळवण्यात आल्या आणि मतदारांना सुरक्षित नागपुरात मतदान केंद्रांवर सोडण्यात आले. मतदार असलेल्या बसेस अडवून भाजपचे मतदान कमी करायचे आणि निवडणुकीचा निकाल फिरवण्याचा हा मोठा प्रयत्न होता. पण सतर्कतेने तो हाणून पाडल्याचेही सूत्र सांगतात.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर तीन वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये भाजपच्या सदस्य मतदारांना ८ डिसेंबरपासून मुक्कामी ठेवण्यात आले होते. यामध्ये नगरपंचायतीचे सदस्य एका ठिकाणी, शहरातील दुसऱ्या ठिकाणी, तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांना तिसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. बसेस अडवल्या जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘अडथळे’ पार करत करत एक-एक करून सदस्यांच्या बसेस नागपुरात पोहोचल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT