Eknath Shinde on nitin deshmukh
Eknath Shinde on nitin deshmukh Sarkarnama
विदर्भ

‘ती’ निकटता देशमुखांना सुरतपर्यंत घेऊन गेली, मात्र सावंतांच्या जवळीकतेने घेतला यू टर्न !

मनोज भिवगडे

अकोला : बाळापूर विधानसभा मतदारसंघातून सन २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार नितीन देशमुख यांची खासदार संजय धोत्रे यांच्यासोबतची निकटता सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाऊन भाजपच्या गोटात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेतील नितीन देशमुखांचे ‘गॉडफादर’ खासदार अरविंद सावंत यांच्यासोबतच्या जवळीकतेने त्यांना ‘यू टर्न’ घेणे भाग पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अकोला (Akola) जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची कमान तत्कालीन जिल्हा परिषद (ZP) सदस्य नितीन देशमुख यांच्याकडे सोपविली होती. खासदार सावंत यांचा आशीर्वादानेच बाळापूर मतदारसंघातून भाजप (BJP) - शिवसेना (Shivsena) युतीकडून त्यांना उमेदवारीही मिळाली होती. भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्यासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध. खासदार धोत्रे गटाचे विरोधक मानल्या जाणारे भाजपचे बाळापूर मतदारसंघातील तत्कालीन उमेदवार नारायणराव गव्हाणकर यांच्या विरोधात सन २००९ मध्ये नितीन देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देशमुखांना विजयी करण्यासाठी खासदार धोत्रे यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचा पहिला आमदार होण्याचा मान देशमुख यांना मिळाला. त्यांनी १८ हजार ७७८ मतांनी विजयश्री खेचून आणली होती. यांना ६९ हजार ३४३ तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचित बहुजन आघाडीने डॉ.. धैर्यवर्धन पुंडकर यांना ५० हजार ५५५ मतं मिळाली होती. देशमुख यांच्या विजयासाठी धोत्रे गटाने केलेल्या प्रयत्नामुळेच आज ते आमदार असल्याचे सर्वत्र बोलले जाते. ही निकटताच त्यांना शिवसेनेतून बंड करणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतपर्यंत घेवून गेली होती.

राजकारणातील ‘गॉडफादर’ ठरले वरचढ !

राजकारणातील त्यांचे ‘गॉडफादर’ खासदार अरविंद सावंत यांच्यामुळे आमदार नितीन देशमुख यांना शिंदे गट सोडून माघारी फिरावे लागल्याचे बोलले जात आहे. खासदार अरविंद सावंत यांनी अकोला जिल्ह्यातील शिवसेनेमधील नितीन देशमुख यांचा विरोधी गट पद्धतशीरपणे संपविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. गेल्या अडीच वर्षांत खासदार सावंतांच्या मदतीनेच कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना व नगरविकास खात्यातून मोठा निधीही आमदार नितीन देशमुख यांनी मिळविला होता. त्यामुळे अरविंद सावंत यांचा एक शब्दही आमदार नितीन देशमुख खाली जाऊ देणार नाहीत, याची कल्पना शिवसेनेच्या धुरीणांना असल्याने शिंदे गटातून त्यांना बाहेर काढत माघारी बोलविण्याचा डाव शिवसेनेच्या मुंबईतील धुरीणांनी यशस्वी करून दाखविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT