MP Bhavana Gawali
MP Bhavana Gawali Sarkarnama
विदर्भ

‘या’ जिल्ह्यातील शिवसैनिकांनी शिंदेंकडे फिरवली पाठ, कदमांच्या भेटीला केवळ सहा शिवसैनिक...

राम चौधरी

वाशीम : राज्यात शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी कडवे आव्हान दिले आहे. जिल्ह्यात खासदार भावना गवळी शिंदे गटात डेरेदाखल होण्यास केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे दूत राजेश कदम यांच्या वाशीम जिल्हा दौऱ्यात शिवसेनेतून केवळ सहा जणच कदमांच्या भेटीला गेल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांची निष्ठा सध्यातरी मातोश्रीवरच असल्याचे दिसत आहे.

खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्या वाशीम दौऱ्यानंतर परिस्थिती बदलण्याची शक्यता नसल्याचा सूर शिवसेनेत आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची (Mahavikas Aghadi Government) इतिश्री होऊन शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या (BJP) साथीने मुख्यमंत्री (Chief Minister) झाले. शिवसेनेत उभी फूट निर्माण झाली असताना पक्षसंघटनही ताब्यात घेण्यासाठी शिंदे गट आकाश पाताळ एक करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाचे विशेष दूत ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक राजेश कदम शनिवारी वाशीम (Washim) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

शिंदे गटासोबत किती शिवसैनिक जाणार याची चाचपणी कदमांच्या दौऱ्याचा मुख्य हेतू होता. मात्र उपजिल्हा प्रमुख भागवत गवळी, रिसोड तालुका प्रमुख महादेव ठाकरे, रिसोड शहर प्रमुख अरुण मगर, मालेगाव शहर प्रमुख संतोष बळी, मालेगाव उपशहर प्रमुख पवन ईरतकर, रिसोड तालुका युवा सेना प्रमुख गजानन अवताडे यांच्या व्यतिरिक्त कोणताही शिवसेनेचा पदाधिकारी कदमांच्या हॉटेलकडे फिरकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक सध्या तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशीच असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.

शिंदे गटाच्या संपर्कात आलेले शिवसेना पदाधिकारी रिसोड व मालेगाव तालुक्यातील आहेत. हे दोन तालुके अकोला लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदार संघात वाशीम, मंगरुळपीर, मानोरा व कारंजा तालुक्याचा समावेश आहे. या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व खासदार भावना गवळी करतात. मात्र या चार तालुक्यातील शिवसेना अभेद्य असल्याचे दिसून येत असल्याने शिवसेनेतील फूट या मतदारसंघात नगण्य असल्याच्या भावना सर्वसामान्य शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहेत.

समाजमाध्यमांवरील बॅनरने शिवसैनिक बिथरले..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दूत राजेश कदम यांच्या वाशीम दौऱ्याच्या दिवशी समाजमाध्यमांवर आम्ही एकनाथ शिंदे समर्थक अशा आशयाचे बॅनर प्रसारित झाले. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, माजी खासदार पुंडलिकराव गवळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार भावना गवळी यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते. हे बॅनर प्रसारित झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांचे फोटो या बॅनरवर का? आम्ही शिवसेनेचे की भाजपचे, असा प्रश्न उपस्थित करत अनेक शिवसैनिकांनी राजेश कदमांच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे.

माजी खासदार पुंडलिकराव गवळी यांनी जिल्ह्यात शिवसेनेचे रोपटे रुजविले खासदार भावना गवळी यांनी त्याला वटवृक्षाचे रूप दिले. तब्बल पाच वेळा लोकसभा मतदार संघ पक्षाच्या खाती जमा केला. एवढे करून खासदार भावना गवळी यांना उद्धव ठाकरे यांनी प्रतोपदावरून काढण्यास संमती दिली, हा अन्याय आहे. यामुळेच आम्ही राजेश कदम यांची भेट घेतली. आम्ही कायम खासदार भावना गवळी यांच्या सोबत राहणार आहोत.

- महादेवराव ठाकरे

शिवसेना तालुकाप्रमुख रिसोड.

वाशीम लोकसभा मतदारसंघातील एकही शिवसैनिक राजेश कदम यांच्या बैठकीकडे फिरकला नाही. कोणीही आले तरी वाशीम जिल्ह्यातील शिवसैनिक कायम उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार आहेत. शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आमच्यासाठी कायम आदरणीय राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य आहे.

- सुरेश मापारी

शिवसेना जिल्हाप्रमुख, वाशीम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT