maharashtra winter session : विधीमंडळाचे अधिवेशन म्हणजे कोणत्याही सरकारची कसोटी असते. सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्ष सतत प्रयत्न करत असतात. त्यातच महाराष्ट्रात नागपूरचे हिवाळी अधिवेशन (maharashtra winter session) म्हणजे तसाही आनंदच असतो. विदर्भाच्या प्रश्नांसाठी म्हणून हे अधिवेशन तेथे घेण्याचा प्रघात आहे. कोरोनामुळे आघाडीच्या काळात नागपूरमध्ये अधिवेशन झाले नाही.
गेल्या काही वर्षांत नागपूर अधिवेशनातील गंमत कमी झाल्या आहेत. तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक राजकीय भूकंप याच नागपूरमध्ये घडले आहेत. दरम्यान, राज्याच्या राजकारणात अनेक घडमोडी घडल्या आहेत. शिवसेनेमध्ये बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.
त्यातच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाडल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारला घेरणार आहे. तसेच आघाडीच्या नेत्यांकडून हे सरकार पडण्यासाठी नव नव्या डेडलाईन दिल्या जात आहेत. त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी आघाडीच्या नेत्यांना फटकारले. शिंदे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याच्या नव्या-नव्या डेडलाईन दिल्या जात आहेत. कधी दोन, महिने कधी तीन असे सांगितले जाते. आता फेब्रुवारीमध्ये सरकार पडणार म्हणतात पण त्यांनी फेब्रुवारी कोणता हे सांगितले नाही.
राज्याच्या राजकारणत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाला होता. त्यावेळी काँग्रेसकडे 75 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागा असे मिळून आघाडीकडे 133 आमदारांचे संख्याबळ होते. तर विधानसभा निवडणुकीत 12 अपक्ष आमदार निवडणून आले होते. काही इतर मित्रपक्ष आणि अपक्षांच्या मदतीने आघाडी सरकार सत्तेत होते.
शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे (BJP) एकत्रित संख्याबळ 127 आमदार होते. सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जास्त संख्याबळाचे अंतर नव्हते. त्यामुळे विलासराव देशमुख यांचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जात होते. त्यामुळे सरकार टिकविणे कसोटीचे होते. `मी रोज सकाळी उठलो की आमदारांची आधी डोकी मोजतो, असे विलासराव त्या वेळी गमतीने म्हणत असत. नागपूरच्या अधिवेशामध्ये विलासराव देशमुख यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आघाडीच्या नेत्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता.
तसेच शिवसेनेमध्ये पहिले मोठे बंड झाले होते ते छगन भुजबळ यांचे. तेही नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळीच झाले होते. भुजबळ शिवसेनेचे 10 आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भुजबळ यांना काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला होता.
सध्याच्या शिंदे-फडणवीसांच्या सरकारकडे भक्कम बहुमत आहे. तरी सुद्दा अनेक दिवसातील राज्यातील राजकारण वेगवेगळी वळणे घेत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची टागती तलवार आहे. त्या संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 10 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे सरकार विषयी शिंदे-फडणवीसांना काळजी घ्यावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.