Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar  Sarkarnama
विदर्भ

कासवाला सुध्‍दा लाज वाटेल, असे महाविकास आघाडीचे काम...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुऱ्यातील मूर्ती या ठिकाणी विमानतळ आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आतापर्यंत हे काम होऊन जायला पाहिजे होते. पण कासवालासुद्धा लाज वाटेल, अशी गतीने महाविकास आघाडी सरकार काम करीत आहे. तरीही हे विमानतळ आणण्यासाठी शासनाशी संघर्ष करेन आणि हे काम झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आज म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले, विमानतळ पूर्ण झाल्‍यास संपूर्ण भारतातील उद्योगपती येथे उद्योगांसाठी येतील. येथे डिफेन्‍स इक्‍युपमेंटचे उद्योग लावायचे असतील तर त्यासाठी रतन टाटा उद्योग स्‍थापन करण्‍यासाठी इच्छुक आहेत. यासोबत राजुरा तालुक्‍यातील अनेक महत्‍वपूर्ण प्रश्‍न ज्‍यामध्‍ये शेतक-यांचे प्रश्‍न, अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्‍नांचा समावेश आहे. महात्‍मा ज्‍योतीबा फुले योजनेअंतर्गत कर्जमुक्‍तीचा फायदा चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख शेतक-यांना झालेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजनेचा फायदा जिल्ह्यातील ३७ हजार नागरिकांपर्यंत पोचलेला नाही. हे प्रश्‍न पत्रव्‍यवहार व पाठपुरावा करून सोडविण्‍यात येतील. राजुरा शहरातील तलावात इकॉर्निया वनस्‍पती वाढल्‍यामुळे मच्‍छीमारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. हा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी सचिव मनीषा पाटणकर– म्‍हैसकर, चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी आणि राजुऱ्याचे मुख्‍याधिकारी यांच्‍याशी झूम मिटींग द्वारे चर्चा करून तलावाच्‍या स्‍वच्‍छतेसोबत, सौंदर्यीकरण करून तलावाचे काम पूर्ण करण्‍यासाठी नियोजन केले जाणार आहे.

राजुरा तालुक्‍यातील विरूर स्‍टेशन येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्र येत्‍या महिन्‍याभरात पूर्ण कार्यक्षमतेने नागरिकांच्‍या सेवेत रुजू होईल. सोबतच राजुरा तालुक्‍यातील सोंडों येथील श्री सिद्धेश्वराचे मंदिर लवकरच उभारण्यात येणार आहे. राजुरा शहरातील राजू डोहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजप जिल्‍हा महासचिव नामदेव डाहूले, आशिष ताजने, निलेश ताजने, सतीश धोटे, सतीश उपलंचीवार, शिवाजी सेलोकर, अरविंद डोहे, संजय मुसळे उपस्थित होते.

राजुरा तालुक्‍यातील विरूर स्‍टेशन येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या इमारतीची पाहणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावेळी ते म्‍हणाले, आरोग्‍य सेवेची इमारत तर तयार आहे. तिला पूर्ण क्षमतेने सुरू करावयाचे असल्‍यास डॉक्‍टर्स, परिचारिका, अन्‍य कर्मचारी, अत्‍याधुनिक वैद्यकीय साधन-सामग्री उपलब्‍ध करून देणे आवश्‍यक आहे. या सा-या कामांची यादी तयार करण्‍याचे निर्देश जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले यांना देऊन येत्‍या दोन महिन्‍यांत पूर्ण कार्यक्षमतेने प्राथमिक आरोग्‍य केंद्र सुरू करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले. त्‍याचबरोबर चंद्रपूरमधील मेडिकल कॉलेजचे ७५ टक्‍के काम पूर्ण झालेले असून ते अंतिम टप्‍प्‍यात आहे.

जिल्ह्यातील कोणत्‍याही गंभीर आजारासाठी लोकांना नागपूरला जाण्‍याची आवश्‍यकता पडू नये. ज्‍यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरिबांचा प्रत्‍येक प्रकारच्‍या आजाराचा उपचार चंद्रपूरच्‍या मेडिकल कॉलेजमध्‍ये होईल. शिर्डी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून थ्री टेस्‍ला मशीन या महाविद्यालयाला उपलब्‍ध करण्‍यात आलेली आहे. टाटा ट्रस्‍टच्‍या मदतीने उभारण्‍यात येत असलेले कॅन्‍सर हॉस्पिटलचे काम प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यात ६५ पी.एच.सी. सेंटर आहेत. चिंचोली येथे महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत महामंडळाचे सबस्‍टेशन मिळवून देण्‍यात येईल. गेल्‍या चार महिन्‍यापासून निराधार योजनेचे पैसे मिळत नाही आहे ते सुध्‍दा मिळवून देण्‍यासाठी मी प्रयत्‍नरत आहे. सोयाबीनची नुकसान भरपाई यासारख्‍या अनेक प्रश्‍नांसाठी विधिमंडळातील संसदीय आयुधांचा वापर करून हे प्रश्‍न सोडविले जातील, असेही आमदार मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

राजुरा तालुक्‍यातील सोंडों येथील श्री सिद्धेश्वराच्या मंदिराची पाहणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या मंदिराच्या उभारणीसाठी आपण सर्वशक्‍तीनिशी प्रयत्‍न करू. येथील १२ ज्‍योर्तिलिंगाच्‍या उभारणीसह मंदिराचा जीर्णोद्धार व परिसराचे सौंदर्यीकरण करण्‍यात येईल. या कामाचा आराखडा निष्‍णात अभियंत्‍याकडून करवून घेऊ. या कामासाठी राज्‍य शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्‍ध करून दिला जाईल, असेही आमदार मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT