विदर्भ

Atul Londhe: ...मग ‘आनंदाचा शिधा’वर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का नाही ?

प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावल्यामुळे महागाई वाढली आहे आणि आता `आनंद शिधा’ या नावाने या लोकांनी गरिबाची थट्टा चालविली आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला.

संजय डाफ

नागपूर : परवाच्या दिवशी आम्ही फिरलो, रवा नव्हता, साखर नव्हती. पॉज मशीन चालत नव्हत्या, त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला. हे आसुरी सरकार आहे. महागाई वाढवून ते आसुरी आनंद घेत आहेत. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावल्यामुळे महागाई वाढली आहे आणि आता `आनंद शिधा’ या नावाने या लोकांनी गरिबाची थट्टा चालविली आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला.

या देशातली गरीब हा स्वाभिमानी आहे, त्याला लाचार समजण्याची चूक या लोकांनी करू नये. सरकारने (State Government) ही बाब लक्षात घेतली पाहिजे. आनंदाचा शिधाची घोषणा करून २० पेक्षा जास्त दिवस झाले. त्यांनी पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी, (Narendra Modi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे फोटो लावले. बाळासाहेबांच्या नावाने तुम्ही महाराष्ट्रात सरकार आणले, तर मग आनंद शिधावर बाळासाहेबांचा फोटो का नाही, असा सवाल अतुल लोंढे यांनी केला.

केंद्र आणि राज्य सरकारमधील हे सर्व लोक फोटोजीवी आहेत आणि फोटो लावण्याच्या स्पर्धेमध्ये त्या सर्व वस्तू गरजूंपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. सरकारमधील लोक सांगत आहेत की दिवाळीसाठी आनंद शिधा देत आहोत. पण लक्ष्मीपूजनाच्या नंतर फराळ सुरू होतो. मग भाऊबीज असते बहिणी घरी येतात किंवा भाऊ बहिणीच्या घरी जातो. पण सरकारचा हा शिधा त्यांच्या कामी पडलाच नाही. सरकारच्या भरवशावर राहिले आणि लोक घरी गोडधोड करू शकले नाही. मग केवळ फोटो छापून कोणत्या कामी आला त्यांचा हा आनंद शिधा, असाही प्रश्‍न लोंढेंनी विचारला आहे.

दिवाळीत मुलांना कपडे, माहेरी आलेल्या मुली, जावयांना गोडधोड करू नाही शकले, कपडे नाही घेऊ शकले, तर अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्या करतो. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याच्या घटना त्यामुळेच वाढत आहेत. या सरकारला विजय माल्याचे कर्ज माफ करण्याचे समजते. अदानीचे १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज काल माफ केले, तेसुद्धा कळते. पण एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो डाळ, एक किलो तेल हे त्यांनीच जाहीर करूनही त्यांच्याकडून देणे होत नाही. हे केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केले जाते. म्हणूनच मुंबईत त्यांनी हे साहित्य दिले. पण लोकांनी ते परत केले.

आनंदाचा शिधा या प्रकरणात लोकांच्या मनात सरकारची इज्जत काय राहिली, हे सर्वसामान्यांना कळून चुकले आहे. यांच्या सरकारमधे सहभागी असलेले आमदार एकमेकांवर ५० खोके घेतल्याचे गंभीर आरोप करीत आहेत. एकमेकांविरोधात खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी स्पर्धा लागलेली आहे आणि या स्पर्धेतूनच हे सर्व प्रकार होत आहेत, असा घणाघाती आरोपही अतुल लोंढे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT