Nana Patole
Nana Patole sarkarnama
विदर्भ

या देशात एकच मोदी नाही, तर नीरव आणि ललित मोदीसारखे पळपुटेही आहेत...

Abhijeet Ghormare

भंडारा : मी ज्या मोदीचा उल्लेख केला, तो गावगुंड होता. नीरव मोदी आणि ललित मोदी, हे पळपुटे देश लुटून पळाले, असे अनेक मोदी या देशात आहेत. जे बदमाश असतील, त्यांच्याबद्दलचं माझं ते वक्तव्य आहे. गावकऱ्यांनी जी तक्रार केली, त्या तक्रारीबद्दल मी बोलत होतो. नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवाले पंतप्रधान (Prime Minister) पदाची गरीमा घालवण्याचे काम करीत आहेत, पण कॉंग्रेस हे होऊ देणार नाही. आता आम्हीसुद्धा भाजपवाल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेणार आहोत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज येथे म्हणाले.

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर पंचायत निवडणुकीकरता आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दोन दिवसापूर्वी नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्या देऊ शकतो’, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटले. नाना पटोले यांनी ते म्हणतात त्या मोदीला तीन तासांत पोलिसांसमोर हजर करावे, असे वक्तव्य केलं आहे. याबद्दल विचारले असता, बावनकुळे हे इतके मोठे नेते नाहीत. त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही, नाना पटोले यांनी सांगितले. देशातले महत्वाचे मुद्दे सोडून जनतेचे लक्ष इतरत्र भरकटवण्यासाठी भाजपचे हे कारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही पटोलेंना अटक करण्याची मागणी केली आहे. गडकरींवर पलटवार करताना नाना म्हणाले की, गडकरी जनतेच्या पैशांनी रस्ते बनवत आहेत. पण ते विदेशी कंपन्यांना विकत आहेत आणि टोलच्या माध्यमातून पुन्हा जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत. याचा हिशोब आता गडकरींनी जनतेला द्यावा. मोदी सरकारमुळे आज भारत हा बेरोजगारांचा देश म्हणून ओळखला जातो. याशिवाय शेतकरी, छोटे व्यापारी त्रस्त आहेत. गरीब लोक अन्नाविना मरत आहेत. याकडे भाजपचे लक्ष नाही आणि फालतुचे मुद्दे उचलून केवळ राजकारण करीत आहेत, असा आरोप नानांनी केला.

पंतप्रधान व्हायच्या आधी मोदींनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये दाऊदला पकडून आणण्याच्या घोषणेचाही समावेश होता. हे लोक आतापर्यंत दाऊदला पकडून आणू शकले नाही. मग कोण्या तोंडाने हे मला सांगत आहेत की, गावगुंड मोदीला पकडून आणा, असा पलटवार त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मागणीवर केला. माझ्या वक्तव्यात मोदी येवढा उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, असे मी कुठेच म्हणालेलो नाही. खरं पाहिलं तर भाजप आता घाबरलेली आहे. त्यामुळे त्यांचे नेते आता उलटसुलट बरळत सुटले आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT