Ujwala Bodhare NCP Sarkarnama
विदर्भ

Ujwala Bodhare : ते असतील ज्येष्ठ, पण त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये !

निक ज्येष्ठ नेतृत्व बहुजन समाजातील कार्यकर्त्यांवर अन्याय करीत आहे. हिंगणा विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्ता मेळाव्याचे साधे निमंत्रणही दिले नाही.

अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : मागील बारा ते पंधरा वर्षापासून हिंगणा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम सातत्याने मागे पडत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा क्षेत्रातील स्थानिक ज्येष्ठ नेतृत्व बहुजन समाजातील कार्यकर्त्यांवर अन्याय करीत आहे. हिंगणा विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे साधे निमंत्रणही दिले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

पक्षाला एकसंघ ठेवून मजबूत करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना निष्ठा शिकवू नये, असा आरोप पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेस (ग्रामीण) जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या (ZP) महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे यांनी केला. हिंगणा पंचायत समिती मध्ये सभापतींच्या कक्षात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बोढारे पुढे म्हणाल्या, हिंगणा विधानसभा क्षेत्रात मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट भाजपमध्ये (BJP) सहभागी झाला. यावेळी पक्षनिष्ठा कायम ठेवत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिलो. विधानसभा क्षेत्र पिंजून काढून पक्षाला उभारी देण्याचे काम केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नव्हते, तेव्हा प्रवीण खाडे यांनी धुरा सांभाळली. अशी वस्तुस्थिती असताना ज्येष्ठ नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी पक्षात बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचे काम सुरू केले आहे. हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिंगणा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याचे निमंत्रण आपल्यासह पंचायत समिती सभापती रूपाली खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे यांना देण्यात आले नाही. यामुळे मेळाव्याला आपण गेलो नाही. परिणामी पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडले. त्यामुळे आता भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे उज्वला बोढारे म्हणाल्या.

हिंगणा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची जिल्हा कार्यकारिणीत आतापर्यंत वर्णी लागू दिली नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष पुंड यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. या नियुक्तीला नेत्याने विरोध केला. पुंड यांची नियुक्ती झाल्यास पक्ष सोडण्याची पोकळ धमकीही त्यांनी दिली होती. आपण आमदारकीच्या उमेदवारी संदर्भात कुठेही चर्चा केली नाही. ही वस्तुस्थिती असताना बहुजन समाजातील महिला नेतृत्व करीत असताना कुठेतरी खच्चीकरण करण्याचे काम नेत्यांनी सुरू केले आहे.

ज्येष्ठ नेते आगामी हिंगणा विधानसभा क्षेत्रात स्वतः: उभे राहत असतील तर आम्ही त्यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेऊ, मात्र आता नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना आमदारकीची संधी दिल्यास ही बाब खपवून घेणार नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेत्याने आता त्यांच्या वयानुसार आराम करणे गरजेचे आहे. नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन सरते शेवटी बोढारे यांनी केले.

ज्येष्ठ नेत्यामुळे रखडले रायपूर व्यापारी संकुल..

हिंगणा विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्याचे गाव रायपूर आहे. या गावाचा विकास मात्र ते करू शकले नाही. रायपूर बाजारात व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. हा प्रस्ताव मंत्रालयात ज्येष्ठ नेत्याच्या आडमुठ्या धोरणामुळे रखडला आहे. यामुळे ३०० गाळ्यांचा समावेश असलेल्या व्यापारी संकुल मंजुरीचे काम थंड बस्त्यात आहे. यामुळे रायपूर गावाचा विकास खऱ्या अर्थाने रखडला असल्याचे जि.प. सभापती बोढारे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या नव्या तालुका अध्यक्षाची नियुक्ती रद्द..

हिंगणा विधानसभा क्षेत्राच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या तालुकाध्यक्षाची नियुक्ती केली. याबाबतची तक्रार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली. कोणत्याही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करताना जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने नियुक्त होणे गरजेचे आहे, असे पत्र पाठविले आहे. यामुळे कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नियमबाह्य असून त्या रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे यांनी दिली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT