Mohan Prakas in  the press conference with MLA Vikas Thakre and others
Mohan Prakas in the press conference with MLA Vikas Thakre and others Sarkarnama
विदर्भ

ही महागाई नव्हे, तर मोदी सरकारची लूटमार आहे...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : महागाई येत असते आणि जात असते. महागाईत शंभर रुपयांची वस्तू पाच ते दहा रुपयांनी महाग होत असते. येथे मात्र सर्वच वस्तूंच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. ही महागाई नसून मोदी सरकारने चालवलेली लूटमार आहे. लीटरभर शंभर रुपयांचे फॉर्च्युनचे तेल २५० रुपयांना विकले जात आहे. या व्यवहारात मोदी सरकारची भागीदारी असल्याचा आरोप अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

देशातील ४१ ऑर्डिनंस फॅक्टरी आणि सर्व सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभक्त कसे, असा सवाल उपस्थित करून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी मोदी सरकारने देशाचे भविष्य विकण्याची सुपारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप केला. हे सर्व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावरून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील वर्षभरात १४ कोटी रोजगार संपले आहेत. छोटे छोटे उद्योजक, दुकानदारांचा व्यवसाय चौपट झाला आहे. याचे प्रमुख कारण ई कॉमर्स कंपन्या आहेत. ई कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने दोन वर्षांत आठ हजार ५६४ कोटी रुपयांचे विधी शुल्क दिले आहे. हा पैसा लाचेच्या स्वरूपात दिला असून तो कोणाच्या घशात गेला, याचे उत्तर सरकारने द्यावे. ई कॉमर्स कंपन्यांना मुक्त व्यापाऱ्याची मोकळीक देऊन मोदी सरकार देशाला आर्थिक गुलामगिरीकडे नेत आहे. भारताच्या संरक्षणासाठी ऑर्डिनंस फॅक्टरी उघडण्यात आल्या होत्या. युद्ध सामग्रीच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला होता. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या फॅक्टरींचे मोदी यांनी खासगीकरण केले असल्याचे मोहन प्रकाश यांनी सांगितले. यावेळी आमदार विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, आशिष दुवा, संदेश सिंगलकर, नरेश गावंडे आदी उपस्थित होते.

अदानीला अटक केव्हा ?

एकदोन ग्राम गांजा सापडलेल्या अभिनेत्रीला तीन महिने कोठडीत डांबून ठेवले होते. तिच्या मागे सीबीआय, एएनआयचा ससेमिरा लावला होता. दुसरीकडे उद्योगपती अदानीच्या मालकीच्या गुजरातमधील बंदरात जहाजभर अंमलीपदार्थ सापडले. मात्र अदानीला अद्याप साधी अटकही केली नाही. गुजरातचे मुद्रा पोर्ट तस्करीचे मोठे केंद्र झाले असून आयात-निर्यातीचे सर्व व्यवहार अदानीच्या हाती देण्यात आले असल्याचे मोहन प्रकाश यांनी सांगितले.

प्रियंका गांधींची सुटका करा..

मोदी आणि योगी दोघेही जण हुकूमशहाप्रमाणे वागत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री आंदोलक शेतकऱ्यांना धमक्या देत आहेत. त्यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडले. हरयाणाचे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हुसकावण्यासाठी हातात लाठ्या घेण्याचा आदेश दिला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना योगी सरकारने मनाई केली आहे. त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. त्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी मोहन प्रकाश यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT