MLA Sameer Meghe and MLA Tekchand Sawarkar
MLA Sameer Meghe and MLA Tekchand Sawarkar Sarkarnama
विदर्भ

BJP : पावसाळी अधिवेशनात या भाजप आमदारांची अशी झाली गोची…

सरकारनामा ब्यूरो

हिंगणा (जि. नागपूर) : मुंबई (Mumbai) येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी अनेक लक्षवेधी प्रश्न लावले होते. विरोधात असताना महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) धारेवर धरण्याची तयारी केली होती. मात्र राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्याने लक्षवेधी प्रश्नांची धार कमी झाली. यातील अनेक प्रश्न लागलेसुद्धा नाहीत. यामुळे भाजप आमदाराची पावसाळी अधिवेशनात पुरती गोची झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यात ग्रामीणमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यांपैकी हिंगणा व कामठी मतदारसंघ भाजपकडे आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार समीर मेघे (Sameer Meghe) तर कामठी विधानसभा मतदारसंघ भाजप आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडे आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना भाजप विरोधी पक्षात होता. महाविकास आघाडी सरकारने भाजपचे आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्रातील विकास कामासाठी निधी देत नसल्याची ओरड सुरू केली होती. यात सर्वात आघाडीवर हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे होते.

महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी अनेक आंदोलने केली. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रात आंदोलन करून हिंगणा येथील शिवाजी चौकात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा विक्रमही आमदार समीर मेघेंनी केला. महाविकास आघाडी सरकारने मागील पंचवार्षिक योजनेत राबविलेल्या विकास कामाचा निधी रोखला होता, हे वास्तव होते. यामुळे ५० ते ८० टक्के कामे प्रगतिपथावर असताना उर्वरित निधी न मिळाल्याने ही कामे थांबली होती.

पावसाळी अधिवेशनात अनेक प्रश्नांसंदर्भात तयारी करून लक्षवेधी मांडण्यात आमदार समीर मेघे आघाडीवर होते. तसेच कामठी मतदार संघाचे आमदार टेकचंद सावरकर यांनीही अनेक प्रश्न मांडले होते. महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी सर्व तयारी या आमदारांनी केली होती. मात्र मधल्या काळात सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीची सत्ता गेली. आता शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या काळात पहिलेच पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. भाजप आमदारांनी लावलेल्या लक्षवेधी अद्यापही सभागृहात आल्या नाहीत.

अधिवेशनाचा आता समारोप होणार असल्याने आपल्या विधानसभा मतदारसंघातील एक तरी प्रश्न लागेल का, असा प्रश्न या दोन्ही आमदारांना पडला आहे. भाजपची सत्ता असल्याने हे दोन्ही आमदार आता रोखठोक भूमिका घेऊ शकत नाही, हे वास्तव आहे. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. यामुळे पावसाळी अधिवेशनात जरी काही करता आले, नाही तरी मागील पंचवार्षिकमध्ये अर्धवट असलेल्या विकास कामांसाठी त्यांच्याकडे निधी मागण्याकरिता जाण्याशिवाय या आमदारांना सध्या पर्याय उरलेला नाही. पावसाळी अधिवेशनात या भाजप आमदारांच्या हाती काही विशेष लागले नसले तरी आगामी काळात कोणत्या पद्धतीने सरकारकडून निधी आणण्याचा प्रयत्न हे आमदार करतात आणि काय कौशल्य हे आमदार वापरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT