Pravin Kunte Patil and Sanjay Rathod
Pravin Kunte Patil and Sanjay Rathod Sarkarnama
विदर्भ

राजकीय स्वार्थासाठी ज्यांना टारगेट केले, त्यांनाच आज मंत्री बनवले !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आज दोघांकडून आज ९-९ आमदारांना मंत्रि‍पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर विरोधी पक्षातील नेते शिंदे-फडणवीस सरकारवर तुटून पडले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वादग्रस्त मंत्र्‍यांवर टिका करण्यात येत आहे.

भाजप (BJP) हा महिला विरोधी पक्ष आहे. आज महिलांची संख्या ५० टक्के आहे. पण आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान देण्यात आलेले नाही. याबद्दल राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) यांनी भाजपवर ट्विट करून टीकेची तोफ डागली आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये एकाही महिलेचा समावेश नसणे भाजपची महिला विरोधी मानसिकता स्पष्ट करीत आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेणे म्हणजे राजकीय स्वार्थासाठी भाजप किती खालच्या स्तराला जाऊ शकते, हेच दिसते. आपल्या स्वार्थासाठी भाजपने संजय राठोडांना टारगेट केले होते. आता भाजपने त्यांची माफी मागितली पाहिजे.’

पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारवर दबाव टाकला, त्यांचा राजीनामा घ्यायला लावला. त्यांच्या विरोधात भाजपचे सर्व नेते बोलत होते. हे दुर्दैवी आहे. भाजप बेभानपणे लोकांवर खोटे-नाटे आरोप करत राहते. अशा परिस्थितीत त्यांचे कुटुंब कोणत्या परिस्थितीतून जात असते, याची कदाचित त्यांना कल्पना नाही. अशा आरोपांमुळे, दबावामुळे एखाद कुटुंब उद्ध्वस्तही होऊ शकते, याची कोणतीही पर्वा भाजप करत नाही. त्यामुळे आता भाजपने संजय राठोड यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलांची माफी मागावी, अशी मागणी कुंटे पाटील यांनी केली आहे.

यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, ' महिलांनी स्वयंपाक घरात जा, स्वयंपाक करा’, अशा स्वरूपाची वक्तव्ये केली होती. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारातूनही त्यांचा हाच विचार समोर आला आहे, की ते महिलांचा मान सन्मान करत नाहीत. संजय राठोडांच्या बाबतीत तर त्यांच्याकडे उत्तरच नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रश्‍न सोयीस्करपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सरकवून दिला आहे. तर ‘पोलिसांनी राठोडांना क्लिन चिट दिल्यानंतर आम्ही त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले’, अशी प्रतिक्रिया देऊन शिंदेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर आमच्या मंत्रिमंडळात लवकरच आपल्याला महिला दिसतील, असे सांगून फडणवीसांनीही आजचा दिवस मारून नेला, असेही प्रवीण कुंटे पाटील यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT