Amravati Politics News : पावसाळा संपून आता हिवाळ्याची चाहूल लागलीय, पण अंबानगरीतील तापलेले राजकीय वातावरण काही केल्या शांत होईनासे झाले आहे. अमरावतीमधील लोकसभा निवडणुकीत नोटा घेण्याच्या वक्तव्यावरून ‘खासदार भाभी’ आणि ‘आमदार ताई’ यांच्यात सुरू झालेले ‘कोल्डवॉर’ आता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही आणखीनच तापणार आहे. अगदी हक्कभंग दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण जाणार असल्याचं खुद्द आमदार ‘ताईं’नीच स्पष्ट केले आहे.
त्याचं असं की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी विकासकामं मंजूर करून घेतली होती. अचानक एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘धनुष्यानं’ सोडलेले ‘बाण’ भात्यात घातले व राज्यात सत्ताबदल झाला. खुर्चीवर येताच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या अनेक कामांना एकनाथ व देवेंद्र दोन्ही ‘भाऊंनी’ स्थगिती दिली.
त्यातील अनेक कामं यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघातलीही होती. (Tiosa's Congress MLA Yashomati Thakur from Amravati will file case of Infringement of rights against CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis, Ajit Pawar in upcoming winter session of Maharashtra held in Nagpur)
नव्या सरकारनं दिलेल्या स्थगितीला ‘ताईंनी’ कोर्टात आव्हान दिलं. कोर्टानं स्थगिती उठवली. आता या सर्व कामांच्या भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यांचा सपाटा सध्या तिवसा विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.
परंतु या कार्यक्रमांना आमदार ‘ताईंना’ डावलत खासदार ‘भाभींना’ बोलावलं जातंय. त्यामुळे ताई चांगल्याच दुखावल्या आहेत. अशा कृतीतून त्यांना डिवचणे व त्यांचा मानभंग केल्यासारखंच होतेय. आता हा ताईंनी हिवाळी अधिवशेनातील थंड माहौलमध्ये पेटविण्याचा निर्णय घेतलाय.
‘तिवसा मतदारसंघात येऊन ज्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा स्वतः उपस्थित राहात आहेत. मात्र, ही विकासकामं महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाली आहेत.
या सर्व कामांवर शिंदे, फडणवीस सरकारने स्टे आणला होता. प्रयत्न करून आम्ही न्यायालयातून स्टे उठवला. आता त्या विकासकामांच्या भूमिपूजनातून जाणीवपूर्वक डावलण्यात येतेय’, असं आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांचं म्हणणं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
‘आजपर्यंत अनेक आमदार, खासदार पाहिले, परंतु दुसऱ्याच्या मतदारसंघात इतका चिल्लरपणा कधी झाला नव्हता’, अशा शब्दांत त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. ‘विरोधी पक्षाचे आमदार असलो तरी आम्हाला काही अधिकार आहेत.
मानसन्मान आहे. त्यामुळं हिवाळी अधिवेशनात अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तसेच ही कामं ज्या अभियंत्यांकडून केली जात आहेत, त्यांच्यावर हक्कभंग आणणार’, असं अॅड. यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.
संतापलेल्या ताई हिवाळी अधिवेशनात हक्कभंग दाखल करतील की नाही, यावर अद्याप राजकीय वर्तुळात कुणी ठामपणे काही बोलू शकत नसले, तरी पुन्हा एकदा अमरावतीकरांना ‘भाभी व्हर्सेस ताई’ असा मान-अपमानाचा सामना बघायला मिळतोय हे नक्कीच.
(Edited by : Prasannaa Jakate)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.