Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray News : दोन दिवसांची तयारी, दिवसभराची प्रतीक्षा, पण ठाकरेंनी केला हिरमोड, अन् मग...

सरकारनामा ब्यूरो

Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केला. नागपूर - यवतमाळ - पोहरा देवी - दिग्रस - अमरावती आणि त्यानंतर पुन्हा नागपूर असा दौरा त्यांनी नऊ आणि १० जुलैला केला. १० जुलैला दिग्रस, अमरावतीप्रमाणे नागपुरातही त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. (He also addressed a gathering of workers in Nagpur)

या संपूर्ण दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. हार, तुरे, रांगोळ्या काय, फटाक्यांची आतषबाजी काय… सर्व वातावरण उद्धवमय झाल्यासारखं वाटत होतं. अमरावतीला पत्रकार परिषद झाली. त्यानंतर कार्यकर्ता मेळावा झाला. तेथेही प्रतिसाद चांगला मिळाला. त्यानंतर त्यांचा ताफा नागपूरच्या दिशेने निघाला.

मार्गात नागपूरच्या काही किलोमीटर अलीकडे त्यांच्या एका जिल्हाप्रमुखाने ठाकरेंच्या स्वागताची, सत्काराची जय्यत तयारी केली होती. ते स्वीकारायला फार फार तर पाच मिनिटं लागली असती. पण उद्धव ठाकरे तेथे थांबले नाहीत. अन् बाहेरूनच दोन मिनिटं बोलून निघून गेले.

त्यानंतर तेथे ज्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेची अशी स्थिती का झाली, हे थोडं थोडं लक्षात यायला लागतं. त्या जिल्हाप्रमुखाच्या प्रतिष्ठानातील सर्व सहकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वीपासून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची तयारी केली होती. त्यांच्यासाठी फुलांची सजावट, रांगोळ्या, पत्र, भेटवस्तू आदी सर्व तयार ठेवले होते. तेवढ्यात संदेश आला की साहेब थांबणार नाहीये. अन् मग फोन करून विनवण्या सुरू झाल्या.

उद्धव साहेब येतील पाहणी करतील, आपल्याशी संवाद साधतील, अशी तेथील सर्वांची अपेक्षा होती. सर्वत्र उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठीचा उत्साह बघायला मिळत होता. पायलट कार येऊन थांबली. मागोमाग ठाकरेंचा ताफाही आला. आरतीचे ताट घेऊन महिला सरसावल्या. पण थोड्या वेळापूर्वी आलेल्या संदेशानुसार, ठाकरेंनी आतमध्ये येण्यास नकार दिला. रस्त्याच्या कडेलाच गाडी थांबवून उद्धव ठाकरे दोन मिनिटं जिल्हाप्रमुख आणि तेथील लोकांशी बोलले आणि वाऱ्याच्या वेगाने धुरळा उडवत नागपूरकडे निघाले.

ठाकरे जिल्हाप्रमुखाच्या विनंतीला मान देऊन आतमध्ये गेले असते, तर फार फार तर पाच ते सात मिनिटं लागले असते. खूप झालं १० मिनिटं. काही फरक पडला नसता. तेथील शेकडो कर्मचारी आनंदले असते की, उद्धव ठाकरेंना आम्ही जवळून पाहिलं, त्यांच्याशी बोललो, असं गावभर सांगत सुटले असते. पण उद्धव ठाकरेंनी तेथे वेळ न देऊन शेकडो लोकांचा हिरमोड केला. त्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती.

ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, तो अगदी सामान्य कार्यकर्ता नाही तर जिल्हाप्रमुख (District Chief) आहे. त्याचे कार्यकर्तेही तेथे आले होते. तेसुद्धा निराश झाले. ‘थांबले असते पाच मिनिटे, तर काय झालं असतं’, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सेना (Shivsena) गतवैभव प्राप्त करण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत उद्धव सेनेला एक-एक माणूस जपणे गरजेचे आहे आणि पाच, सात मिनिटं खर्च करून हजार लोक जुळत असतील, तर काय हरकत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया एका सुजाण नागरिकाने दिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT