Uddhav Thackeray’s Shiv Sena Announces Stand on Alliance : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहील का? आघाडी झाल्यास काँग्रेस किती जागा सोडेल? असा प्रश्न ठाकरे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना पडला आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर जे काही व्हायचे ते होईल, मात्र आपण गाफील राहायचे नाही. असा निर्णय घेऊन ठाकरे गटाने सर्व कार्यकर्त्यांनी सध्यातरी स्वबळावर निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. सोबतच कुठले विषय घेऊन शहरात आंदोलने करायची, कोणावर प्रहार करायचा हेसुद्धा ठरवण्यात आले आहे.
जागावाटप आणि तिकीट वाटपात समन्वय ठेवण्यासाठी यापूर्वी ठाकरे गटाच्यावतीने एक शहर एक नेता असे धोरण ठरवले होते. संपर्क प्रमुखांना या कामात सहसंपर्क प्रमुख आणि राज्य संघटकांना सोबत घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी रविभवन येथे संघटक सागर डबरासे यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रीतम कापसे, वाहतूक सेनाप्रमुख राजेश वाघमारे, उपजिल्हाप्रमुख मनोज शाहू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी नागपूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्वच विधानसभा क्षेत्राची संघटन समीक्षा करण्यात आली. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या विषयाला हात घालण्यात आला. ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची राज्यात सत्ता होती. जागांनुसार सर्वात मोठा पक्ष असल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा मान देण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत बरोबरीचे स्थान द्यावे अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली.
तसेच जागा वाटपात पक्षाला बरोबरीचे स्थान मिळाले नाही, तर स्वबळावर लढण्याचा आपला मार्ग मोकळा आहे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. याकरिता प्रत्येक वॉर्ड, प्रभागातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागवे असे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले असल्याचे सागर डबरासे यांनी सांगितले.
तत्पूर्वी महापालिकेच्यावतीने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्लू कंपनीच्या विरोधात तसेच नागरिकांच्या समस्या घेऊन महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून आंदोलन करण्यासही सांगण्यात आले आहे. मागील निवडणुकीत ठाकरे गटाचे दोनच नगरसेवक निवडून आले होते. मध्यंतरी संजय राऊत यांनी नागपूरमध्ये येऊन महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. यावरून ठाकरे गटात मोठे मतभेद उफाळून आले होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.