Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Nagpur News : ठाकरेंचे दबावतंत्र, काँग्रेसमध्ये अस्वस्थता; विदर्भात जोर वाढला

Political News : काँग्रेसने अलीकडेच नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला असल्याचे संपर्क प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिले.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर शहरात सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. हा दबाव झुगारून लावण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने आता दोन ऐवजी तीन विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. दक्षिण आणि पूर्व हे दोन मतदारसंघाला शिवसेनेचे प्राधान्य होते आता त्याच मध्य नागपूर विधानसभेची भर टाकण्यात आली आहे. काँग्रसेचे स्थानिक कार्यकर्ते एकही मतदारसंघ देणार नाही, असे कितीही मोठ्याने सांगत असले तरी असे कसे देत नाहीत, हे आम्ही बघून घेऊ असा इशारा पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी दिला.

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या उपस्थितीत शनिवारी पूर्व विदर्भातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. नागपूर ते गडचिरोलीपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. बैठकीमध्ये काँग्रेसने (Congress) अलीकडेच नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला असल्याचे संपर्क प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिले.

नागपूर येथे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. यात शहर काँग्रेसच्यावतीने सर्व सहा जागा काँग्रेसला देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. यावर भास्कर जाधव यांनी भाष्य केले. ते म्हणाले, जागा वाटप करण्याचा अधिकार एकट्या काँग्रेसला नाही. महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसून कोणाला, कुठल्या आणि किती जागा द्यायच्या याचा निर्णय घेतील. कोणी जागांवर दावे करीत असेल तरी त्याला काही अर्थ नाही. उद्वव ठाकरे यांच्या नागपूर शहरात तीन जागा मागणार आहे.

महाविकास आघाडी झाल्यानंतर शिवसेनेने रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता. त्या बदल्यात ग्रामीण आणि शहरातील जागा वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपसोबत युती असताना नागपूरमधील दक्षिण आणि ग्रामीणमध्ये रामटेक आणि काटोल विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होते. काटोलमध्ये अनिल देशमुख आमदार असल्याने त्या ऐवजी कामठी किंवा हिंगणा हे दोन मतदारसंघ द्यावे, यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत.

शहरात तुलनेत शिवसेनेची ताकद कमी असली तरी आपले प्रतिनिधित्व राहावे, यासाठी सुरुवातील दोन जागांची मागणी केली जात होती. काँग्रेस फारतर एक जागा सोडेल, असा अंदाज होता. आता मात्र शिवसेनेने तीन मतदारसंघाची मागणी करून काँग्रेसवर दबाव वाढवला असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT