Devendra Godbole and Uddhav Thakeray
Devendra Godbole and Uddhav Thakeray Sarkarnama
विदर्भ

Shivsena : आता आक्रमक चेहरा करणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतृत्व !

सरकारनामा ब्यूरो

Shivsena District Chief Devendra Godbole News : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्यानंतर शिवसेनेची वाताहत झाली. नंतरच्या लढाईत शिवसेनेचे एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे असे दोन गट झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मूळ शिवसेनेतील लोक मोठ्या संख्येने त्यांच्याकडे गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला नागपूर शहरासह जिल्ह्यात गळती लागली. आता शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक चेहरा असलेले देवेंद्र गोडबोले यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांना नियुक्तीची भेट मिळाली आहे. यानिमित्ताने शिवसेनेने नागपूर (Nagpur) जिल्ह्यात आक्रमक चेहऱ्यांकडे नेतृत्व दिले आहे. संदीप इटकेलवार यांनी शिंदे (Eknath Shinde) गटाशी संधान साधल्याने शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील जिल्हाप्रमुख पदाची जागा रिक्त झाली होती. देवेंद्र गोडबोले जिल्ह्यातील पूर्वेकडच्या कामठी, उमरेड व रामटेक (Ramtek) या तीन विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सांभाळतील. तर उर्वरित जिल्ह्याच्या पश्चिमेकडील काटोल, सावनेर आणि हिंगणा विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून राजेंद्र हरणे कायम आहेत. उपजिल्हाप्रमुख म्हणून देवेंद्र गोडबोले (Devendra Godbole) कामठी विधानसभा क्षेत्राचे संघटन प्रमुख होते. कामठी विधानसभा क्षेत्रातील मौदा तालुक्यात त्यांचे वर्चस्व आहे.

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबतच जिल्हाप्रमुख इटकेलवार व रामटेकचे शिवसैनिकही शिंदे गटासोबत गेले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेला नेतृत्व नसल्याने अनेकांनी जिल्हाप्रमुख या पदावर दावा केला होता. त्यात माजी खासदार प्रकाश जाधव, माजी जिल्हाप्रमुख राधेश्याम हटवार, पांडुरंग बुरडे त्यांच्यासह काही उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख आणि गोडबोले यांचा समावेश होता. लोकप्रियता, नेतृत्व व स्वच्छ प्रतिमा म्हणून गोडबोले यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी पसंती दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नियुक्तीने शिवसेनेत नवी ऊर्जा संचारेल, अशी चर्चा आहे.

कोण आहेत गोडबोले ?

जुने काँग्रेसचे असलेले गोडबोले हे मौदा पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व करताना उपसभापतिपदी होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत जिल्हा परिषदेत एन्ट्री मारली. जिल्हा परिषदेतील आक्रमक चेहरा म्हणून ते नावारूपास आले. त्यानंतर त्यांच्या पत्नी भारती यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली व विजयी झाल्या. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा काही मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला होता. एनटीपीसी मौदाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने मांडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

गद्दारांना जागा दाखविणार..

शिवसेना (ठाकरे) जिल्ह्यातील गावागावांत कार्यकर्ते आहेत. त्यांना भेटून सक्रिय करण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाणार आहे. गद्दारी करणाऱ्या नेत्यांना पक्षाने भरभरून दिले. तरीही त्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना त्यांची जागा येणाऱ्या विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत दाखविणार असल्याचे देवेंद्र गोडबोले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT