Posters in Bhandara. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : नेत्यांच्या बॅनरबाजीमुळे विद्रुपीकरणात भर

Political Hordings : धोकादायक ठिकाणी लावले जात आहेत फलक

अभिजीत घोरमारे

Bhandara Municipal Council : भंडाऱ्यातील नगरपरिषद परिसरात गेल्या काही दिवसांपासून विनापरवानगी बॅनरबाजी करण्याचे प्रकार वाढले आहेत. या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. फुकट्या बॅनरबाजीला वेळीच आळा घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. व्यावसायिक संस्था, दुकानदार आणि राजकीय नेतेही आपली माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी शहरात प्रचार करीत आहेत.

राजकीय आणि अराजकीय असलेल्या या जाहिरातबाजीसाठी खुल्या जागेवर बॅनर, पोस्टर लावले जात आहेत. हे पोस्टर, बॅनर लावताना धोकादायक जागाही सोडली जात नाही. भंडारा शहरासह अनेक भागांत विजेच्या खांबावर असे बॅनर, पोस्टर, शुभेच्छा फलक लटकविलेले दिसत आहेत.

सण, उत्सवानिमित्त वीज खांबावर झेंडे, तोरण लावले जात आहेत. हा प्रकार एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतो. मात्र याबाबत भंडारा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. भंडारा शहरासह गावागावांमध्ये महावितरणद्वारे वीज पुरवठ्यासाठी तसेच पथदिवे लावण्यासाठी विद्युत खांब लावण्यात आले आहेत. या विद्युत खांबांचा वापर सध्या जाहीरातबाजीसाठी केला जात आहे. अनेक विद्युत खांबांवर जाहिरातीचे पोस्टर, शुभेच्छा बॅनर लटकलेले नजरेस पडतात.

सामाजिक, राजकीय कार्यक्रमात कार्यकर्त्यांकडून तसेच उत्सवादरम्यान अनेक सार्वजनिक उत्सव समितीद्वारे विद्युत खांबावर झेंडे लटकविले जातात. विद्युत खांबावरील वीज तारांवरून नेहमीच विद्युत प्रवाह सुरू असतो. अशावेळी विद्युत खांबावर चढून जाहिरातीचे फलक, तोरण लावणाऱ्यांसाठी ते धोकादायक ठरू शकते. महावितरणकडून विद्युत खांबाला स्पर्श करू नये, असे आवाहन करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत नागरिक शहरातील विद्युत खांबांवर बॅनर, झेंडे, फलक, पोस्टर लावताना दिसत आहेत. यावर आळा घालण्यासाठी महावितरणने योग्य उपाययोजना करून कारवाई करणे गरजेचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडारा शहरातील मुख्य बस स्थानकाच्या मार्गावरील विद्युत खांबांवर अशाप्रकारे बॅनर, पोस्टर, फलक मोठ्या प्रमाणात लावलेले दिसत आहेत. याकडे महावितरणसह नगरपरिषद प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज आहे. सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही सामाजिक, धार्मिक संघटना, उत्सव समितीद्वारे रस्त्यांवर झेंडे, बॅनर व तोरण बांधून परिसराला सुशोभित केले जाते. मात्र अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या विद्युत खांबासह वीज तारांवरही तोरण लटकविले जाते. हा प्रकार रात्रीच्या सुमारास केला जातो. त्यामुळे कुणाच्याही ते निदर्शनास येत नाही. वीज तारांवर तोरण लटकविणे जीवघेणे ठरू शकते. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बॅनरबाजीबाबत उच्च न्यायालयानेही निर्देश दिले आहेत. मात्र त्याचे पालन नगरपरिषद क्षेत्रात होत नसल्याचे दिसत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT