Nitin Gadkari & Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Gadkari & Fadnavis on Nagpur Flood : गडकरी म्हणाले, अंबाझरी कुणाचं बाळ, सगळे विभाग घेताहेत एकमेकांवर आळ

Priority Set: संत्रानगरी पुन्हा नाही बुडणार; फडणवीसही म्हणाले असे उपाय करणार

Atul Mehere

Nagpur Political News : नागपूर शहरात २२ सप्टेंबर २०३ रोजी मध्य रात्रीपासून सकाळपर्यंत चार तासांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळं नागपूर शहर पाण्याखाली बुडालं होतं. यासंदर्भात नागपूर येथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. ४) पत्रकार परिषदेत घेत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. या वेळी गडकरी म्हणाले की, ज्या अंबाझरी तलावामुळं शहरात हाहाकार उडाला, ते अंबाझरी नावाचं बाळ कुणाचंय, हे अद्यापही ठाऊक नाही.

शहरात अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेला अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळंही नागपूरच्या पुरात भर पडली. त्यावर बोलताना गडकरींनी सांगितलं की, अंबाझरी तलाव कुणाचं बाळ आहे, हे अद्यापही कोणत्याही विभागाला ठाऊक नाही. त्यामुळं या बाळाचं पालकत्व कुणीतरी घ्यायला हवं त्याशिवाय काही खरं नाही. (Union Minister Nitin Gadkari, DCM Devendra Fadnavis to take massive measures to prevent flood situation in Nagpur)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं विरोधकांनी त्यावर रान पेटवलं होतं. नागपुरात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून संत्रानगरीचे दोन्ही सुपुत्र गडकरी आणि फडणवीस एकवटले. शहरात पुन्हा असा प्रकार घडणार नाही, यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती दोन्ही नेत्यांनी या वेळी दिली.

नागपूर शहरात सप्टेंबर महिन्यात सुमारे ११२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळं नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या भिंती, नाल्यांच्या भिंती क्षतीग्रस्त झाल्या. परिणामी लगतच्या परिसरात पाणी शिरले. मूलभूत साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नागपुरात यापुढं असा प्रकार घडणार नाही, यासाठी महसूल, महापालिका व संबंधित विभागांना आदेश देण्यात आल्याचं गडकरी व फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरातील अंबाझरी धरण भोसलेकालीन आहे. अंदाजे दीडशे वर्ष जुनं आहे. सांडव्याच्या जीर्ण भिंतीला काँक्रीट जॅकेटिंग केले जाणार आहे. सांडव्याच्या खालील बाजूला आरसीसी रिटेनिंग वॉल बनविली जाईल. धरणाच्या दृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून २१.०७ कोटी रुपयांचा प्रस्तावास पाटबंधारे विभागातर्फे मान्यता देण्यात आलीय.

मातीच्या धरणाचं क्रॉस सेक्शन दुरुस्ती व दगडी पिचिंगची काम करण्यात येणार आहे. धरणाच्या खालील बाजूस ‘टो ड्रेन’साठी ११.२५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचं गडकरी व फडणवीस यांनी सांगितलं. धरणाच्या पाळीपासून पुढील १०० मीटरपर्यंत कोणताही अडथळा निर्माण न होता प्रवाह सुरळीत होण्याच्या दृष्टीनं पाण्याच्या विसर्गाबाबत ‘हायड्रॉलिक कॅल्कुलेशन’ आवश्यक ते बदल करण्यात येणार आहे. नागपूर सुधार प्रन्यासव्दारे नाग नदीवर उभारण्यात आलेल्या ‘स्केटिंगरिंक’च्या पार्किंग बांधकामातून पाण्याचा निचरा होण्यासाठी महत्त्वाचं काम करण्यात येणार आहे, असं या वेळी स्पष्ट करण्यात आलं.

शहरातून वाहणाऱ्या नाग नदीच्या अंबाझरी ओव्हरफ्लो ते पंचशील सिनेमापर्यंत क्षतीग्रस्त संरक्षण भिंतीचे बांधकाम व खोलीकरण करण्यात येईल. नागनदी- अंबाझरी ओव्हरफ्लो ते पंचशील टॉकीजपर्यंतच्या नाल्याची एकूण लांबी ४.८० किलोमीटर आहे. यापैकी २.३७ किलोमीटर लांबीच्या दोन्ही बाजूच्या सुरक्षा भिंती पुन्हा उभारण्यात येणार आहे. या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेतर्फे २३४.२१ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आलाय.

नाग नदीचा प्रवाह सध्या बिघडलाय. हा प्रवाह सुरळीत केला जाणार आहे. नदीची वहन क्षमता वाढविण्यासाठी अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट ते पंचशील सिनेमापर्यंतच्या ४.८० किमीच्या नदीच्या पात्राचे एक ते दीड मीटर खोलीकरण करण्यात येणार आहे. आपत्ती निवारणासाठी पूर्वतयारीचा (डिझास्टर मिटिगेशन मेजर्स) भाग म्हणून नागपूर शहरातील सर्व नदी-नाल्याचं एकत्रित करण्याबाबत विचार सुरू आहे. याशिवाय या नदीनाल्यांवर रिटेनिंग वॉल्स, पूल आणि अन्य बांधकामं तसेच व्यवस्था करण्यासंबंधी ८४८.७२ कोटी रुपयांचा प्रस्ताव नागपूर महापालिकेनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला पाठवलाय, असं गडकरी आणि फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

(Edited By : Atul Mehere)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT