Prataprao Jadhav Sarkarnama
विदर्भ

Prataprao Jadhav: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणतात; 'आमच्या तीन पिढ्यांनी शेतीचं वीजबिल भरलेलं नाही...'

Deepak Kulkarni

Buldhana News: बुलडाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. ते बुलडाणा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले आहेत.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत डेंजर झोनमधील बुलडाणा मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्याविरोधात लढवली आणि जिंकली.

त्यानंतर अनेक इच्छुकांचा पत्ता कट होऊन खासदार प्रतापराव जाधवांना मंत्रि‍पदाची कुणाच्या मनी ध्यानी नसतानाही लॉटरी लागली. पण आता याच खासदार प्रतापराव जाधवांनी (Prataprao Jadhav) एक भन्नाट किस्सा सांगताना स्वत:च्या पक्षासह महायुतीलाही अडचणीत आणणारं विधान केलं आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम पार पडला.यावेळी मंत्री प्रतापराव जाधव यांनी तुफान शा‍ब्दिक फटकेबाजी केली.

ते म्हणाले,आपण शेतकरी आहोत. आपल्या तीन पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलेलं नाही,माझे आजोबा, वडील आणि मीसुध्दा कधीच वीज बिल भरलेलं नाही.किंबहुना कधी विजेची डी.पी. जळाली तर संबंधित इंजिनिअरला एक हजार रुपये दिले की झालं काम! असा भन्नाट किस्सा सांगितल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आमच्या महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे काँग्रेसवाले कोर्टात गेले. पण अगदी सावत्र भाऊ सुध्दा असं कधी वागत नाही, असंही मत मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.यापूर्वी तीनवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

खासदार जाधव म्हणाले,लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दिलेला 'चारशे पार'चा नारा हा आमच्या चांगलाच अंगलट आला असल्याची कबुलीही मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली.या नाऱ्यामुळे आमचे कार्यकर्ते गाफील राहिले.पण हे सगळं असलं तरी पुन्हा एकदा शिस्तीने चालणारा पंतप्रधान नशिबाने या देशाला मिळाला आहे.अनेक कठीण प्रश्न त्यांनी सहजरित्या सोडवलेले अनेकदा दिसून आले आहेत असे कौतुकोद्गारही त्यांनी आपल्या भाषणात काढले.

केंद्र आणि राज्य सरकार समविचारी असले की विकास होतो. दोन समविचारी बैल शेतीला जुंपले की ती चांगली होते, तसं सरकारचंही आहे. पंतप्रधान मोदींचं प्रत्येक खासदारावर, प्रत्येक खात्यांवर अगदी बारीक लक्ष असतं असेही मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.यावेळी त्यांनी एक खंतही बोलून दाखवला.ते म्हणाले, मंत्री झाल्यावर आमचा सामान्य माणसाशी संपर्क कमी होतो आहे.

आम्हाला उद्धव ठाकरे यांचा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय पटला नव्हता.मात्र, एक आशा होती की, आपला नेता मुख्यमंत्री झाला तर न्याय मिळेल.पण आमचा नेता घरात बसून कारभार करत होता.कुणालाही वेळ देत नव्हता असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT