Akola Vanchit Bahujan Yuva Aghadi News : एकीकडे रेकॉर्डवर खताचा साठा उपलब्ध असल्याचे दिसत असताना प्रत्यक्ष कृषी सेवा केंद्रांत एकही बॅग शिल्लक नाही. या बनवाबनवीविरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडीने थेट कृषी अधिकाऱ्यांनाच गाडीवरून बसवून कृषी सेवा केंद्रांची पाहणी करण्यासाठी फिरविले. (The Vanchit Bahujan Yuva Aghadi directly boarded the agriculture officials on bike)
वंचितच्या या प्रयत्नात युरिया वितरणातील बनवाबनवी उघड झाल्याने एका केंद्रावर जिल्हा भरारी पथकाने कारवाईसुद्धा केली. जिल्ह्यात ऑनलाइन २६०० टन खत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याविरुद्ध (आज ता. २१) वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे व महासचिव राजकुमार दामोदर यांचे नेतृत्वात जिल्हा कृषी अधिकारी यांना घेराव घातला.
त्यांना जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रावरील स्टिंग ऑपरेशनचे ‘व्हिडिओ’ दाखवून थेट गाडीवर बसवून कृषी केंद्रात धाव घेतली. गोडाऊनचा पंचनामा करायला भाग पाडले. शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर अधिकाऱ्यांना ठोकून काढू, असा इशारादेखील वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे. यापूर्वी सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात कृषी अधिकारी यांना भेटून जिल्ह्यातील कृत्रिम खत टंचाई विरोधात उपाययोजना करण्याची मागणी करून गोडावून ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासोबत आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी साळके यांच्यासोबत दुचाकीवर बसवून संजय कृषी सेवा केंद्र गाठले. येथे प्रत्यक्ष ४६ टन साठा ऑनलाइन दिसत असताना संजय कृषी सेवा केंद्र संचालकांनी येथे एकही बॅग उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावर जिल्हा कृषी अधिकारी यांनी स्वत:चा परिचय देत त्याचे रेकॉर्ड तपासले.
त्यात आधार कार्ड आणि ‘थंब व्हेरिफिकेशन’शिवाय खत वितरित केले असल्याचे सिद्ध झाले. पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी मोघाड यांच्या निर्देशानुसार आधार व्हेरिफिकेशन शिवाय वाटप करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती केंद्रचालक ऑपरेटर याने दिली. गोडावून तपासणीत २३ पोते युरिया उपलब्ध असल्याचे आढळून आले. त्याचा पंचनामा करण्यात आला.
अकोला (Akola) जिल्ह्यात कृत्रिम खत टंचाई असून, शेतकऱ्यांची (Farmers) लूट चालवली आहे. कृषी अधिकारी यात सहभागी असून, कमिशन घेत असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांची लूट थांबवून, कृषी विभागाने वितरणातील धोरण न बदलल्यास अधिकाऱ्यांना ठोकून काढण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) दिला आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.