Vandhit Bahujan Aghadi
Vandhit Bahujan Aghadi Sarkarnama
विदर्भ

राजुरा मतदारसंघासाठी वंचितने जनता दरबारातून फुंकले रणशिंग !

संदीप रायपूरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा वाद सर्वोच्च न्यायeलयात सुरू आहे. लवकरच यासंदर्भात निकाल येईल, असे सांगितले जात आहे. या निकालानंतर राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.अशा परिस्थितीत राजुरा विधानसभा मतदारसंघात वंचित बहूजन आघाडीने रणशिंग फुंकले आहे.

विशेष म्हणजे मागील निवडणुकीत वंचितने (Vanchit Bahujan Aghadi) पाठींबा दिलेल्या उमेदवाराने चाळीस हजारांहून अधिक मतं घेत प्रस्थापितांना धक्का दिला होता. राजुरा विधानसभा क्षेत्राच्या विजयाचे गणीत गोंडपिपरी तालुका मांडतो हा आजपर्यतचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे सर्वच प्रमूख पक्षांनी या तालुक्याकडे विशेष लक्ष आजवर दिलेले आहे. आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे यांचे वाढलेले दौरे होत आणि होत असलेल्या विविध कार्यक्रम म्हणजे जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती निवडणुकांची तयारी समजली जात आहे.

विधानसभेच्या या रंगीत तालमीत आता वंचित बहूजन आघाडीनेही उडी घेतली आहे. वंचीतचे जिल्याध्यक्ष भूषण फुसे राजूरा विधानसभा क्षेत्राकडे विशेष लक्ष देत आहेत. जातीनिहाय समीकरण लक्षात घेतल्यास या क्षेत्रात अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. वंचितचे तालुकाध्यक्ष डाॅ. प्रकाश तोहोगावकर, जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात नूकताच जनता दरबार घेण्यात आला. या दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत वंचित पुन्हा प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान उभे करणार, असे बोलले जात आहे.

नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांचे निराकरण करीत त्यांना तुमच्यासोबत असल्याबाबत आश्वस्त करण्यात आले आहे. वंचित आघाडी संपुर्ण ताकतिनिशी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांसह राजूरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा निर्धार जनता दरबाराच्या औचित्याने करण्यात आला आहे.

राजूरा विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या आहेत. या क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्यांनी सामान्यांना न्याय दिला नाही. रस्त्यांची कामे होत नाहीत. साधी बस सूरू करण्यासाठी अपयशी ठरत आहेत. शाळांना शिक्षक नाही, पिण्यास शुध्द पाणी नाही. रोजगाराअभावी तरूणांची मानसिकता खराब होत आहे. अशावेळी आता वंचितच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करणार आहोत.

- भूषण फूसे जिल्हाध्यक्ष, वंचित बहूजन आघाडी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT