Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettewar : वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांसोबत युती केली नाही, तर निष्क्रीयतेमुळे चंद्रपुरात आले अपयश !

सरकारनामा ब्यूरो

MLA Vijay Wadettiwar's News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हांवर लढल्या जात नाहीत. तेथे स्थानिक समीकरणे काम करीत असतात. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पराभवासाठी माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एकत्र आले, हे साफ चुकीचे आहे, अशी माहिती आमदार वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी दिली. (There is constant nagging at each other)

चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीचे जे काही निकाल आले, ते म्हणजे स्थानिक राजकारणाचा परिपाक आहे. बाजार समितीचे राजकारण करताना एकमेकांवर कुरघोड्या करणे सतत सुरू असते. तेथील कॉंग्रेस आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपसात ठरवून युती केली आणि निवडणूक लढली. त्यामध्ये आमदार वडेट्टीवार यांचा काहीही हस्तक्षेप नव्हता. ते निवडणुकीसंदर्भातील एकाही बैठकीला गेले नाहीत की कुठे फिरलेही नाहीत, असे वडेट्टीवार समर्थकांचे म्हणणे आहे.

आमदार वडेट्टीवार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युती केली, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण तसं असतं तर मग केवळ चंद्रपूरसाठी ही युती राहिली नसती, तर मूल, पोंभूर्णा आदी ठिकाणीही युती झाली असती. राहिली कॉंग्रेसच्या पराभवाची बाब तर कॉंग्रेस नेते आणि चंद्रपूरचे खासदार म्हणून त्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे. स्वतःचे गाव असलेल्या चंद्रपूर बाजार समितीवर त्यांची एकहाती सत्ता यायला हवी होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे.

कॉग्रेस नेते म्हणून त्यांनी बाजार समिती एकहाती आणण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. स्वतः खासदार आणि त्यांच्याकडे आमदार असूनही यश मिळाले नाही. स्वतःच्या गावात तरी हार पत्करावी लागू नये. कारण स्वतःच्या गावात ही स्थिती असेल तर पुढचे राजकारण खासदारांना अवघड जाईल. लोक त्यांच्यावर नाराज आहेत, अशीही चर्चा असल्याचे वडेट्टीवार समर्थकांचे म्हणणे आहे.

दरवर्षी दोन ते अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न चंद्रपूर (Chandrapur) बाजार समितीचे आहे. पण यापूर्वी बाजार समितीत भ्रष्टाचार केला गेला. हा भ्रष्टाचार सहा कोटी रुपयांच्या घरात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आमदार वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या नेतृत्वात मूल बाजार समितीमध्ये (APMC Election) विजय मिळाला. उद्या पोंभूर्णाची निवडणूक आहे, तेथेही विजय कॉंग्रेसचाच (Congress) होणार आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातही आम्ही उद्या विजय मिळवू, असा विश्‍वास समर्थकांनी व्यक्त केला. केवळ बदनाम करण्यासाठी अशा अफवा पसरवल्यात जात असल्याचा आरोप वडेट्टीवार समर्थकांनी केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT