Maharashtra Politics : काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी मुख्यमंत्री अशेाक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात काँग्रेस फुटल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे काही नेते, आमदार ‘आउट ऑफ कव्हरेज’ झाले आहेत. अशात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यानंतर विजय वडेट्टीवारही त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस सोडून जातील, असे सांगण्यात येत होते. मात्र, तसे काहीही होणार नाही, असे वडेट्टीवार यांनी ठासून सांगितले. आपण सध्या मतदारसंघात दौऱ्यावर आहोत. चव्हाणांच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती मिळाली आहे. परंतु आपण मतदारसंघातील कामांमध्ये व्यस्त असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर आपणही काँग्रेसमधून बाहेर पडू, असे विरोधकांकडून सांगितले जात आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आपण काम केले आहे. त्यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. एकाच पक्षात काम करताना अनेक मुद्द्यांवर चर्चा व्हायची. ते काँग्रेस सोडून जातील असे वाटले नव्हते. चव्हाण यांचा अचानक राजीनामा देण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे. राजीनाम्याची घटना अनपेक्षित अशीच आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशोक चव्हाण यांनी नेमका कोणत्या कारणांसाठी राजीनामा दिला, याबद्दल ते स्वत:च विस्ताराने सांगू शकतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. आपण यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थ आहोत, असेही ते म्हणाले. सध्या भाजपकडून अनेक पक्षातील नेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. सीबीआय, आयकर, ईडी अशा संस्थांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात हा प्रकार सुरू आहे, अशी खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
भाजपकडून अनेक राजकीय पक्षांना संपविण्याचे काम केले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी असे काही तरी केले जाईल, असे अपेक्षित होते. परंतु अशोक चव्हाण यातून राजीनामा देतील हे अनपेक्षित होते. भाजपला सध्या सत्तेची गुर्मी आहे. त्यांच्याकडून संविधानाचा अवमान केला जात आहे. कायदा पायदळी तुडविला जात आहे. विरोधी पक्षांना व त्यातील नेत्यांना संपविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना सुपारी देण्यात आली आहे. अशात जनताच भाजपची मग्रुरी उतरवेल व त्यांना धडा शिकवेल, असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.