Vikas Thakre and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Vikas Thakre Met Fadnavis : स्वपक्षीयाचा 'पंजा' छाटण्यासाठी काँग्रेसच्या आमदाराचा 'देवा'कडे धावा !

Atul Mehere

Nagpur Political News : नागपुरात आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीत दोन नेत्यांमध्ये झालेल्या 'फ्री स्टाइल'चा प्रसंग ताजा असतानाच काँग्रेसच्या एका आमदाराने आपल्याच स्वपक्षीय प्रतिस्पर्धीचा 'पंजा' छाटण्यासाठी नागपुरातील देवगिरीवर भाजपच्या 'देवा'कडे धावा घेतला व 'नरेंद्र' मिळालेले 'विकास'काम थांबवण्यासाठी 'देवेंद्र'ला साकडे घातले. (The Congress dispute in Nagpur has reached an official complaint)

काँग्रेसच्या वतीने काही दिवसांपूर्वी नागपूरच्या महाकाळकर सभागृहामध्ये विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माइकवर बोलण्याच्या वादावरून काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे व नरेंद्र जिचकार यांच्यात व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच 'फ्री स्टाइल' झाली. काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांसमोर हा वाद रंगला होता. या वादावर अद्यापही पडदा पडलेला नाही.

उलट आता नरेंद्र जिचकार यांच्या संदर्भातील तक्रार घेऊन आज (ता. १८) काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी निवासस्थानावर दाखल झाले. नागपूरच्या अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह पाडून त्या ठिकाणी अम्युजमेंट पार्क तयार करण्याच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना भेटत असल्याचे ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

प्रदेश काँग्रेसचे महासचिव नरेंद्र जिचकार त्यांच्या गरुड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या परिसरातील अंबाझरी उद्यानाचे पुनर्विकास करून अम्युजमेंट पार्क तयार करण्याचे काम देण्यात आले होते. नागपूर काँग्रेसच्या विभागीय बैठकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि काँग्रेसचे महासचिव नरेंद्र जिचकार यांच्यात वाद झाला. ठाकरे आणि जिचकार यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांत धक्काबुक्की केली.

विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यातला वाद ताजा असताना विकास ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेसच्या विभागीय बैठकीत झालेल्या वादाकडे सर्वच वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे चांगलेच दुखावले आहेत.

अशात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वादाला आता भलतेच वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाच्या मुद्द्यावरून नागपुरात गेले अनेक दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत.

या संदर्भात आमदार विकास ठाकरे यांनी तक्रार केली असल्यास या सांस्कृतिक भवनाच्या खाली दडलेली सगळीच गुपितं बाहेर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. जमिनीत पुरलेली ही गुपितं बाहेर निघाल्यास नरेंद्र जिचकार यांच्यासह अनेक मोठी नावे अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंबाझरीच्या मुद्द्यावर कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे  लक्ष  लागून  आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT